कोल्हापूर – जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या ‘महादेवी’ (Mahadevi) ऊर्फ ‘माधुरी’ हत्तीणीला अखेर काल सोमवारी रात्री गुजरातच्या ‘वनतारा’ (Vantara)कडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी संतप्त जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना (Police)लाठीमार करावा लागला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र मठाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. त्यानंतर काल सोमवारी ‘महादेवी’ला वनताराच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी संतप्त जमावाने दगडफेक केल्याने दोन पोलिस वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी लाठीमार करून जमाव नियंत्रणात आणला.’महादेवी’ला वनताराकडे पाठवू नये, यासाठी नांदणी परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ‘महादेवी’ला वनताराच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करताना तिची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘महादेवी’ च्या डोळ्यातून अश्रु वाहत असल्याचे पाहून जनसमुदायालाही अश्रू अनावर झाले होते. नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘महादेवी ‘ हा निरोप सोहळा पार पडला.