अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांना योगेश कदमांविरोधात पुरावे दिले

anil parab VS yogesh kadam


मुंबई- राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या डान्सबारवर (Dance bar) काही दिवसांपूर्वी कारवाई झाली होती. त्यानंतर हा डान्सबार आपण चालवत नसल्याचे स्पष्टीकरण योगेश कदम यांच्याकडून देण्यात आले. या विषयाचे सविस्तर पुरावे, डान्स बार प्रतिबंधक कायदा, खेड येथील अवैध वाळूउपसा या संदर्भातील सर्व पुरावे आपण मुख्यमंत्र्यांकडे (CM Devendra Fadanvis) दिल्याचे शिवसेना उबाठा (UBT) गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीचा तपशील देताना ते म्हणाले की, योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या डान्स बारवर टाकलेल्या छाप्याचा पंचनामा, २२ बारबाला, २२ ग्राहक यांची माहिती व प्रथमदर्शनी नोंद झालेल्या गुन्ह्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली. त्याआधी २०२३ मध्ये या बारवर टाकलेल्या छाप्यांचीही सविस्तर माहिती दिली. डान्सबार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी व इतर बाबीही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. डान्स बार चालवायला दिला असला तरी त्याची जबाबदारी ही मूळ मालकावर येते. त्या कायद्याचीही प्रत दिली असून खेडमध्ये झालेल्या अवैध वाळू उपसासंबंधी व्हिडीयो, फोटो व इतर कागदपत्रेही त्यांच्याकडे दिली आहेत. या बारवर अनेकवेळा कारवाई झाली असल्याने ते वारंवार गुन्हे करतात याचीही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सर्व कागदपत्रे तपासून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.