‘आमच्या मनात सध्या तरी…’, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देवेंद्र फडणवीसांकडून ‘ब्रेक’

CM Devendra Fadnavis On Jayant Patil

CM Devendra Fadnavis On Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे या चर्चांना भरपूर उधाण आले. मात्र, जयंत पाटील यांनी यापूर्वीच या गोष्टी फेटाळून लावत आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुंबईत अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जयंत पाटील यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत विचारले. सांगलीतून आणखी प्रवेश होईल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावर फडणवीस म्हणाले, “तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो आमच्या मनात सध्या तरी नाही.” या उत्तरानंतर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही काळासाठी तरी ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले.

जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

जयंत पाटील यांनी याआधीच स्पष्ट केले की, भाजपात प्रवेशाबाबत कुणी त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि त्यांनीही विनंती केली नाही. “प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून एवढ्या गोष्टी कशा काढल्या जातात? मी कुठे जाणार? हे माध्यमांनीच ठरवले,” असे ते म्हणाले होते. अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशानंतर त्यांनी पुन्हा “थोडे दिवस थांबा आणि पाहा,” असे सूचक वक्तव्य केले, ज्यामुळे चर्चांना नवीन वळण मिळाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण उपस्थित होते. डांगे हे जयंत पाटील यांचे जवळचे मानले जातात. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला असून, सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.