Tata Motors to acquire truck maker Iveco: टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा खरेदी व्यवहार करणार आहे. कंपनीने इटलीची ट्रक निर्माता कंपनी इव्हेको ग्रुपला (Iveco Group) खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनी इटालियन व्यावसायिक वाहन निर्माता इव्हेको ग्रुपला 3.8 अब्ज युरोंना (जवळपास 38,240 कोटी रुपये) विकत घेणार आहे. यात संरक्षण व्यवसायाचा समावेश नाही. हा व्यवहार टाटा मोटर्सची आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी ठरणार आहे. (Tata Motors to acquire truck maker Iveco)
कंपनीच्या संचालक मंडळाने इव्हेको ग्रुपच्या 100 टक्के सामान्य शेअर्स अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. ही खरेदी रोख ऐच्छिक निविदा ऑफरद्वारे होईल आणि सर्व नियामक मंजुरींवर अवलंबून आहे. यात 271,215,400 शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न आहे, ज्याला किमान 80 टक्के समभाग स्वीकृती लागेल. प्रत्येक शेअर्स साठी 14.1 युरो रोख रक्कम देण्यात येईल. हा व्यवहार एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दोन्ही कंपन्यांचा फायदा
टाटा मोटर्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, हा करार कंपनीच्या व्यावसायिक वाहन व्यवसायाला नवीन उंचीवर नेईल. भारत आणि युरोपमध्ये धोरणात्मक बाजारपेठांसह जागतिक स्पर्धा करता येईल. इव्हेको ग्रुपच्या अध्यक्षा सुझॅन हेवुड यांनी सांगितले की, हा करार शाश्वत गतिशीलतेसाठी दोन्ही कंपन्यांना एकत्र आणतो. रोजगार आणि औद्योगिक विस्तारासाठी सकारात्मक संधी निर्माण होतील.
आर्थिक आणि तांत्रिक बळकटी
या कराराने दोन्ही कंपन्यांचे उत्पादन पोर्टफोलिओ आणि क्षमता वाढेल. एकत्रित महसूल 22 अब्ज युरो, म्हणजेच 2,20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये 50 टक्के, भारतात 35 टक्के आणि अमेरिकेत 15 टक्के व्यवसाय असेल. आशिया आणि आफ्रिकेतील उदयोन्मुख बाजारपेठांतही मजबूत स्थिती असेल.
इव्हेको ग्रुप ट्रक, बसेस आणि आर्थिक सेवा देते. हा करार संरक्षणेतर व्यवसायाला जोडेल. टाटा मोटर्सची ही खरेदी 2007 मध्ये कोरस ग्रुपच्या 12 अब्ज डॉलरच्या अधिग्रहणानंतर समूहाची दुसरी मोठी खरेदी ठरली आहे. यामुळे कंपनीला जागतिक स्तरावर 5,40,000 युनिट्सपेक्षा जास्त विक्रीची संधी निर्माण होईल.