Yuzvendra Chahal on divorce with Dhanashree: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) काही महिन्यांपूर्वी पत्नी धनश्रीसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. घटस्फोटाचे कारण काय होते, हे स्पष्ट झाले नसले तरीही सोशल मीडियावर याबाबत प्रचंड चर्चा रंगली होती. आता घटस्फोटानंतर पहिल्यांदाच युझवेंद्रने पत्नी धनश्री वर्मासोबतच्या नात्यावर भाष्य केले आहे
पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात काय घडले आणि घटस्फोटाच्या काळात त्यांना मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागले, याबाबत त्याने माहिती दिली.यावर्षी सुरुवातीला घटस्फोटाच्या चर्चांमुळे त्यांच्यावर चीटर असल्याचा आरोप झाला होता, ज्याने त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला होता, असेही त्याने सांगितले.
राज शमानीच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने घटस्फोट, धनश्रीसोबतचे नाते यावर भाष्य केले.
नात्यातील दुरावा
चहल म्हणाला, “हे खूप दिवसांपासून सुरू होते. आम्ही लोकांना दाखवायचे नाही, असा निर्णय घेतला होता. जर हे शक्य झाले नसते, तर परिस्थिती वेगळी झाली असती. आम्ही एक सामान्य जोडपे असल्यासारखे सोशल मीडियावर दाखवत होतो, कारण अंतिम निर्णय होईपर्यंत आम्हाला काहीही बोलायचे नव्हते.” त्यावेळी आपण खोटे वागत होतो का? या प्रश्नावर चहलने ‘हो’ असे उत्तर दिले.
‘करिअरमुळे दुरावा वाढला’
या नात्यात दुरावा का वाढला, यावर बोलताना चहलने स्पष्ट केले की, तो आणि धनश्री दोघेही आपापल्या करिअरवर खूप लक्ष केंद्रित करत होते. त्यामुळे नात्याला प्राधान्य देणे कठीण झाले. त्यामुळे दोघांच्यामधील दुरावा वाढत गेला.
चहल पुढे म्हणाला, “मी भारतासाठी क्रिकेट खेळत होतो आणि ती तिच्या करिअरमध्ये व्यस्त होती. हे 1-2 वर्षे सुरू होते. त्यावेळी मला इकडेही वेळ द्यावा लागत होता आणि तिकडेही. मी नात्याबद्दल विचार करू शकत नव्हतो. मग दररोज हेच घडायला लागल्यावर तुम्ही विचार करता की आता हे सोडून द्यावे. दोन महत्त्वाकांक्षी लोक एकत्र राहू शकतात, पण प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य, स्वतःचे ध्येय असते. जोडीदार म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा दिला पाहिजे. तुम्ही 18-20 वर्षांपासून ज्या गोष्टीसाठी काम करत आहात, ती एका नात्यासाठी सोडून देऊ शकत नाही.”
‘मला चीटर म्हटले गेले’
यावर्षी घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान लोकांकडून आपल्याला ‘चीटर’म्हटले गेल्याचेही चहलने सांगितले. चहल म्हणाला की, मी आयुष्यात कधीच फसवणूक केलेली नाही. मी तसा माणूस नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रामाणिक माणूस सापडणार नाही. मी माझ्या जवळच्या लोकांसाठी नेहमीच मनापासून विचार करतो. लोकांना काहीच माहिती नसताना ते माझ्यावर आरोप करत होते.
लोकांच्या टीकेचा सामना करताना आणि वैयक्तिक संघर्षांमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे चहलने कबूल केले. तो म्हणाला की, त्याला नैराश्य, रात्री झोप न लागणे आणि आत्महत्येचे विचारही येत होते. मला आत्महत्येचे विचार येत होते. मी माझ्या आयुष्याला कंटाळलो होतो,मला क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा होता, कारण मी त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो, असेही यावेळी बोलताना तो म्हणाला.