मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वानखेडे स्टेडियममध्ये एक क्रिकेट संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळादेखील येथे उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे नाव एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय असे ठेवण्यात आले असून त्याचे उद्घाटन या महिनाखेरीस होणार आहे.
एमसीएच्या या सन्मानाविषयी गावस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, माझा पुतळा नवीन एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे. मी एमसीएचा आभारी आहे. त्यांच्यामुळे मी क्रिकेटमध्ये माझे पहिले पाऊल टाकले आणि नंतर मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. मी किती आनंदी आहे हे शब्दात सांगू शकत नाही.