अमेरिकेत बेपत्ता झालेल्या भारतीय वंशाच्या ‘त्या’ 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमके काय घडले?

Indian Family Death in USA

Indian Family Death in USA: अमेरिकेत भारतीय वंशाचे 4 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. आता तपासादरम्यान अपघातात (Indian Family Death in USA) या 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्कहून वेस्ट व्हर्जिनियाला प्रवास करत असताना भारतीय वंशाच्या एका कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कुटुंबातील चारही सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये डॉ. किशोर दिवान, आशा दिवान, शैलेश दिवान आणि गीता दिवान यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेस्ट व्हर्जिनियाच्या मार्शल काउंटीमधील बिग व्हीलिंग क्रीक रोडवर एका तीव्र उतारावरून त्यांची गाडी खाली कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण होता आणि त्यात सर्वांचा मृत्यू झाला.

नेमके काय घडले?

हे कुटुंब 29 जुलै रोजी दुपारी 2:45 वाजता पेनसिल्वेनियाच्या एरी येथे एका रेस्टॉरंटमध्ये अखेरचे दिसले होते. तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबातील दोन सदस्य आत जाताना दिसले. त्यांचे शेवटचे पेमेंटही तिथेच झाले होता.

यानंतर एका अधिकाऱ्याने त्यांची गाडी इंटरस्टेट 79 वरून दक्षिणेकडे जाताना पाहिली. हे कुटुंब मांड्सविले येथील प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड या धार्मिक स्थळाकडे जात होते. त्यांनी तिथे राहण्याची आधीच व्यवस्था केली होती, पण ते पोहोचलेच नाहीत.

पोलीस आणि अनेक संस्थांनी त्यांचा शोध घेतला. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मांड्सविले येथे आढळले, परंतु संपर्क होऊ शकला नाही. मार्शल काउंटीच्या शेरीफ कार्यालयाने त्यांच्या गाडीचे फोटो आणि तपशील जारी केले होते. सध्या या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.