‘…तर आम्ही अर्ध्या जगाला घेऊन बुडू’, अमेरिकेतून पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

Asim Munir

Asim Munir: पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर (Field Marshal Asim Munir) यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. जर भारताकडून पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, तर “अर्ध्या जगाला घेऊन बुडू” , असे वक्तव्य मुनीर यांनी केले आहे.

मुनीर यांनी जूनमध्येही अमेरिकेचा दौरा केला होता, जिथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना भारताला धमकी दिली आहे.

“आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला घेऊन बुडू.”, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले.

मुनीर यांनी गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिका दौरा केला आहे. यावेळी त्यांनी भारतावर सिंधू नदीच्या (Indus River) पाणीवाटपावरूनही निशाणा साधला.

“भारत सिंचनासाठी धरण बांधण्याची वाट आम्ही बघू. पण जेव्हा ते धरण बांधले जाईल, तेव्हा आम्ही 10 क्षेपणास्त्रांनी ते नष्ट करू,” असे मुनीर म्हणाले. “सिंधू नदी ही भारतीयांची कौटुंबिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमी नाही,” असेही त्यांनी सांगितल्याचे

भारत मर्सिडीज, पाकिस्तान कचरा गाडी

भारताला धमक्या देताना आणि पाकिस्तानमधील खनिज संपत्तीची बढाई मारताना, मुनीर यांनी चुकून भारतासमोर पाकिस्तानची खरी स्थिती काय आहे, हेच दाखवून दिले.

जनरल असीम मुनीर यांनी फ्लोरिडामधील टँपा येथे पाकिस्तानी समुदायाच्या एका कार्यक्रमात म्हटले, “भारत महामार्गावर फेरारीसारखी चमकणारी मर्सिडीज आहे, तर आम्ही खडीने भरलेली कचरा गाडी आहोत. जर कचरा गाडी त्या कारला धडकली, तर कोणाचे नुकसान होईल?”

राजकीय आणि लष्करी नेत्यांशी भेट

मुनीर यांनी त्यांच्या दौऱ्यात अमेरिकेतील वरिष्ठ राजकीय आणि लष्करी व्यक्तींची भेट घेतली. टँपामधील समारंभात मुनीरने अमेरिकेचे मावळते केंद्रीय कमांड कमांडर जनरल मायकेल कुरिला यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच, त्यांनी जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांचीही भेट घेतली आणि त्यांना पाकिस्तान भेटीचे आमंत्रण दिले.