Balochistan Liberation Army: अमेरिकेने पाकिस्तानमधील ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (BLA) आणि तिच्या ‘मजीद ब्रिगेड’ (Majeed Brigade) या गटाला ‘परदेशी दहशतवादी संघटना’ (Foreign Terrorist Organisation) म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे.
2019 मध्ये या गटाला ‘विशेषतः नियुक्त जागतिक दहशतवादी’ (SDGT) म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी एका निवेदनात सांगितले की, “2019 पासून बीएलएने, विशेषतः मजीद ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.”
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यानंतर अवघ्या काही तासातच अमेरिकेने बीएलएला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. यापूर्वी, अमेरिकेने भारतातील जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेलाही ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून बीएलएवर (BLA) अमेरिकेच्या लक्ष होते. दहशतवादी घटनांच्या मालिकेमुळे 2019 मध्ये तिला पहिल्यांदा ‘एसडीजीटी’ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर, या गटाने अनेक हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे, ज्यात आत्मघाती हल्ले आणि मजीद ब्रिगेडने केलेले हाय-प्रोफाईल हल्ले यांचा समावेश आहे.
कराची आणि ग्वादारजवळील आत्मघाती हल्ले
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार, 2024 मध्ये कराची विमानतळ आणि ग्वादार बंदर प्राधिकरण संकुलाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी बीएलएने घेतली होती. मार्च 2025 मध्ये, या गटाने क्वेटा ते पेशावर जाणाऱ्या ‘जाफर एक्सप्रेस’ ट्रेनचे अपहरण केल्याचे कबूल केले होते. या घटनेत 31 नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यादरम्यान 300 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते.
अमेरिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “या हिंसक कृत्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे आणि प्रदेशातील शांतता भंग होत आहे.”
‘एफटीओ’ (FTO) म्हणून घोषित केल्यामुळे अमेरिका सरकारला या गटाची संपत्ती गोठवण्याचे, त्यांच्या कारवायांना पाठिंबा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि इतर देशांसोबत सहकार्य करून त्यांचे कार्य थांबवण्याचे अधिकार मिळतात.
बीएलए ही अमेरिकेने आणि पाकिस्तानने दहशतवादी गट म्हणून घोषित केलेली संघटना आहे. पाकिस्तान सरकारविरोधात अनेक दशकांपासून ही संघटना बंडखोरी करत आहे आणि खनिज समृद्ध असलेल्या बलुचिस्तान प्रांतासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहे.