Ajit Pawar on Meat Ban: राज्यातील काही महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती येथील महापालिकांनी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय राज्यातील राजकारणात तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
अजित पवारांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. याबाबत ते म्हणाले की, “मी टीव्हीवर बातमी पाहिली. श्रद्धेचा प्रश्न असतो, तेव्हा अशी बंदी ठीक आहे, उदा. आषाढी एकादशी किंवा महाशिवरात्र. पण स्वातंत्र्य दिनी, देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली आहेत. कोकणात भाजी करताना सुकट किंवा बोंबील वापरतात, तो त्यांचा आहार आहे. मग कोणाच्या आहारावर बंदी घालणे योग्य नाही.”
पवार पुढे म्हणाले, “राज्यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहेत. प्रत्येकाला आपला आहार घेण्याचा अधिकार आहे. महत्त्वाच्या दिवशी अशी बंदी घालणे चुकीचे आहे.”
आदित्य ठाकरे यांचा विरोध
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही जोरदार टीका केली. त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली. ते म्हणाले, “व्हेज की नॉन-व्हेज हा त्यांचा मुद्दा नाही. स्वातंत्र्यदिनी काय खावे हे आमचे स्वातंत्र्य आहे. आमच्या घरी नॉन-व्हेज खाल्ले जाते, आम्ही ते खाणारच. नवरात्रीमध्येही माशाचा नैवेद्य असतो.”
महापालिकेचा दावा
कल्याण डोंबिवली, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकांनी 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचे ठरवले. मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या तीन दिवसांसाठी बंदी घातली, ज्यात स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती आणि गणेश चतुर्थीचा समावेश आहे. यामागे धार्मिक सलोखा आणि सार्वजनिक शांतता राखणे हे कारण दिले जात आहे.