Home / देश-विदेश / पंतप्रधान मोदींचा पुढील महिन्यात अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता

पंतप्रधान मोदींचा पुढील महिन्यात अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता

PM Narendra Modi US Visit

PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी (UNGA) अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान, त्यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय व्यापार आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक होण्याचे नियोजन सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची ठरू शकते. सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क शहरात होणाऱ्या महासभा शिखर परिषदेसाठी 23 सप्टेंबरपासून जागतिक नेते उपस्थित राहतील. याबाबत इंडिया टूडेने वृत्त दिले आहे.

या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्यासह इतर जागतिक नेत्यांसोबतही चर्चा करू शकतात. जर ही भेट झाली, तर सात महिन्यांतील ही दोन्ही नेत्यांची दुसरी भेट असेल. याआधी फेब्रुवारीत मोदींनी व्हाइट हाऊसचा दौरा केला होता. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये चांगले वैयक्तिक संबंध होते, पण दुसऱ्या कार्यकाळात शुल्क वाढवण्याच्या धोरणांमुळे तणाव वाढला आहे.

संबंधातील तणाव

गेल्याकाही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहे. व्यापार करारावर तोडगा निघालेला नाही, कारण भारत कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांचे दरवाजे उघडण्यास तयार नाही. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणेही अमेरिकेला मान्य नाही.

व्यापारातील अडथळ्यांमुळे ट्रम्प यांनी भारताच्या उत्पादनांवर 25 टक्के शुल्क वाढवले आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे आणखी 25 टक्के शुल्क लावले गेले, ज्यामुळे एकूण शुल्क 50 टक्के झाले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची होणारी भेट महत्त्वाची ठरू शकते.