Marathi Ekikaran Samiti Protest At Dadar Kabutarkhana: मुंबईतील दादरच्या प्रसिद्ध कबुतरखाना परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाना बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतरही काही लोक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. या विरोधात मराठी एकीकरण समितीने आज (13 ऑगस्ट) आंदोलन पुकारले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कबुतरखाना परिसरात गोंधळ घातला, त्यामुळे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
या आंदोलनात संयुक्त मराठी चळवळीच्या लोकांनीही पाठिंबा दर्शवला. पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावली होती, तसेच जमावबंदी आदेश (Curfew Order) लागू असल्याचेही सांगितले होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आंदोलक जबाबदार असतील असा इशाराही दिला होता. मात्र, तरीही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव
आंदोलनामुळे कबुतरखाना परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलाची (SRPF) तुकडीही तिथे उपस्थित होती.
यावेळी अनेक आंदोलक डोक्यावर टोपी घालून जोरदार घोषणाबाजी करताना दिसले. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. “आम्हाला आमची भूमिका मांडू द्या, आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो आहोत,” असे देशमुख यांनी सांगितले.
जैन मंदिराचा दरवाजा बंद
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कबुतरखाना परिसरातील दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच, जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही सकाळपासून बंद ठेवण्यात आला होता.
कबुतरखान्याचा वाद का पेटला?
उच्च न्यायालयाने दादरचा कबुतरखाना बंद करण्याचा आदेश दिल्यानंतरही, काही लोक जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावरून कबुतरांना दाणे टाकत आहेत, असा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे. यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
याच वादातून काही दिवसांपूर्वी जैन मुनींनी ‘शस्त्र उगारण्याची’ भाषा वापरली होती, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला. त्याला उत्तर देण्यासाठी मराठी एकीकरण समितीने हे आंदोलन पुकारले आहे. समितीच्या मते, कबुतरखान्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे.