JDS Leader on Stray Dogs Issue: सध्या देशभरात भटक्या कुत्र्यांचा (Stray Dogs) मुद्दा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील कुत्र्यांना कायमस्वरूपी निवारागृहांमध्ये हलवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर यावरून प्राणीप्रेमींकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. यातच आता कर्नाटकातील जनता दल सेक्युलर (JDS) पक्षाचे आमदार एस.एल. भोजेगौडा (SL Bhojegowda) यांनी एका वादग्रस्त विधानाने नवा वाद निर्माण केला आहे.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी 2,800 भटक्या कुत्र्यांना मारल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून ‘कुत्र्यांवर कारवाई करणारा कर्नाटक हा पहिला राज्य ठरेल.’
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार विधान परिषदेत बोलताना भोजेगौडा म्हणाले, “आम्हाला प्राण्यांचीही काळजी आहे, पण प्राणीप्रेमी ही एक वेगळीच डोकेदुखी आहे. पण तुम्ही लहान मुलांच्या वेदना पाहा. रोज वर्तमानपत्र आणि टीव्हीवर याबद्दल बातम्या येतात.”
“आम्ही एकदा मांसात काहीतरी मिसळून सुमारे 2,800 कुत्र्यांना खाऊ घातले आणि नंतर त्यांना नारळाच्या झाडाखाली पुरले. मुलांच्या सुरक्षिततेसाठी गरज पडल्यास जेलमध्येही जायला तयार आहे.”, असे वक्तव्य केल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) भागातील भटक्या कुत्र्यांच्या (Stray dogs) प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आता मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता तीन न्यायाधीशांच्या नव्याने स्थापन केलेल्या खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे.
याआधी न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआरमधील (NCR) महानगरपालिकांना तातडीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचे आणि त्यांना कायमस्वरूपी निवारागृहांमध्ये हलवण्याचे निर्देश दिले होते.