Shilpa Shetty On Rs 60 Crore Fraud Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका मुंबईस्थित व्यावसायिकाने त्यांच्यावर 60 कोटींची फसवणूककेल्याचा आरोप आहे. यानंतर आता त्यांनी हे आरोप ‘निराधार आणि बदनामीकारक’ असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांना उत्तर देताना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाने आरोप केला आहे की, त्यांनी 2015 ते 2023 या काळात शिल्पा आणि राज यांच्या ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी 60.48 कोटी रुपये दिले होते, पण त्यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरली.
नेमके प्रकरण काय आहे?
NDTV च्या रिपोर्टनुसार, दीपक कोठारी, ‘लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’चे संचालक आहेत. कोठारी यांच्यानुसार 2015 मध्ये शिल्पा आणि राज यांनी75 कोटींचे कर्ज मागितले होते. त्यावेळी व्याजाचा दर 12% होता.
त्यानंतर त्यांनी कोठारी यांना कर्जाऐवजी ‘गुंतवणूक’ म्हणून रक्कम देण्यास सांगितले आणि मासिक परतावा तसेच मुद्दल परत करण्याचे आश्वासन दिले. कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये 31.95 कोटी आणि सप्टेंबर 2015 मध्ये 28.53 कोटी रुपये असे एकूण 60.48 कोटी रुपये ‘बेस्ट डील टीव्ही’च्या बँक खात्यात जमा केले.
कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, वारंवार प्रयत्न करूनही त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यांनी या जोडप्यावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
शिल्पा आणि राज कुंद्रांचे स्पष्टीकरण
या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘हे सर्व आरोप निराधार आणि बदनामीकारक आहेत. हे प्रकरण पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचे असून, यावर याआधीच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने निर्णय दिला आहे.’
वकिलांनी पुढे म्हटले आहे की, ‘या प्रकरणात कोणताही फौजदारी गुन्हा नाही. कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. आम्ही आर्थिक गुन्हे शाखेला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि कॅश फ्लो स्टेटमेंट्स सादर केली आहेत.’ हा गुन्हा फक्त त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने दाखल केला आहे, असेही वकिलांनी स्पष्ट केले आहे.