Rajinikanth completes 50 years in cinema: भारतीय चित्रपटसृष्टीतील (Indian cinema) सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी नुकतेच आपल्या अभिनयाच्या प्रवासाला 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांचा पहिला चित्रपट ‘अपूर्व रागंगल’ (Apoorva Raagangal) प्रदर्शित झाला. चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.
पहिल्या चित्रपटात जरी त्यांची भूमिका लहान असली, तरी त्यांच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. आज 74 व्या वर्षीही ते सर्वात जास्त मानधन घेणारे आणि सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते आहेत.
शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड (Shivaji Rao Gaekwad) आहे, त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. आई गृहिणी आणि वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. लहानपणीच आईचे निधन झाल्यावर त्यांनी अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या.
कुली म्हणूनही त्यांनी काम केले, जिथे त्यांच्या मित्राने त्यांची थट्टा केली होती. त्यानंतर, त्यांनी बंगळूर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची करी स्वीकारली. तेव्हा त्यांचा पगार 750 रुपये होता.
बस कंडक्टरमधील ‘ती’ स्टाईल, जी जगप्रसिद्ध झाली
चित्रपटांमधील सिगारेट उडवणे, गॉगल फिरवणे यांसारख्या रजनीकांतच्या खास स्टाईल्स (Signature style) जगप्रसिद्ध आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यातील अनेक स्टाईल्स त्यांनी बस कंडक्टर असतानाच विकसित केल्या होत्या.
प्रवाशांवर आपली छाप पाडण्यासाठी ते केस मागे सारणे, शिट्टी वाजवणे यांसारख्या हालचाली करत असत. महिला प्रवाशांना त्यांची ही स्टाईल खूप आवडायची. याच ‘बस कंडक्टरमधील’ स्टाईलने त्यांना चित्रपटांमध्येही यश मिळवून दिले.
सीबीएसई अभ्यासक्रमातही रजनीकांत
रजनीकांत यांचा संघर्ष आणि यश इतके प्रेरणादायी आहे की, त्यांचा जीवनप्रवास सीबीएसई (CBSE) शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनला आहे. ‘बस कंडक्टर ते सुपरस्टार’ या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि यशाच्या प्रवासाची माहिती दिली जाते. एखाद्या चित्रपट अभिनेत्याचा अभ्यासक्रमात समावेश होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.
लग्नाचा खास किस्सा
रजनीकांत यांच्या लग्नाचा किस्साही खूप रंजक आहे. चेन्नईच्या एका कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याची विद्यार्थिनी असलेल्या लता रंगचारी (Latha Rangachari) यांनी त्यांच्या मुलाखतीसाठी वेळ मागितली होती. पहिल्या भेटीतच रजनीकांत त्यांच्या प्रेमात पडले आणि मुलाखतीदरम्यान त्यांनी थेट लताला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 26 फेब्रुवारी 1981 रोजी तिरुपती येथील मंदिरात त्यांचे लग्न झाले. त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत.
मुख्य भूमिकेत पदार्पण आणि यशस्वी चित्रपट
‘अपूर्व रागंगल’ नंतर त्यांनी काही काळ नकारात्मक भूमिका केल्या. मात्र, 1980 च्या दशकात त्यांनी नायक म्हणून स्वतःला सिद्ध केले. ‘बिल्ला’ (Billa), ‘डॉन’ (Don), ‘मुरुट्टू कालई’ (Murattu Kaalai) आणि ‘धर्माथिन थलैवन’ (Dharmathin Thalaivan) यांसारख्या चित्रपटांनी त्यांना ‘मास हिरो’ बनवले.
90 च्या दशकात त्यांनी ‘अण्णामलाई’ (Annamalai), ‘बाशा’ (Baasha) आणि ‘मुथू’ (Muthu) यांसारखे ब्लॉकबस्टर (Blockbuster) चित्रपट दिले. ‘मुथू’ हा जपानमध्येही (Japan) खूप लोकप्रिय झाला. 2000 नंतर त्यांनी ‘शिवाजी’ (Sivaji), ‘रोबोट’ (Enthiran) आणि ‘2.0’ यांसारख्या तंत्रज्ञान-आधारित चित्रपटांमध्ये काम केले, ज्यांनी जगभरात मोठे यश मिळवले. त्यांनी तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये 170 हून अधिक चित्रपट केले आहेत.