मुंबई- काल मुसळधार पावसाने मुंबईला संकटात टाकल्यानंतर आजही तितक्याच जोमाने मुंबई आणि उपनगरांत पाऊस बरसला. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी दिल्याने मुलांना त्रास झाला नाही. मात्र चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 300 मिमी ते 250 मिमी इतका प्रचंड पाऊस रात्री पासूनच्या 24 तासांत झाल्यामुळे सर्वच परिसर जलमय झाला होता. सकाळनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा निचरा होणे अशक्य झाले. काही तासांतच मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्ण कोलमडली. दुपारनंतर पश्चिम रेल्वेही थबकली. मुंबई, पुणे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. उद्या फक्त रायगडला रेड अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागांना ऑरेंज अलर्ट आहे. यामुळे उद्याही मुसळधार पावसाची टांगती तलवार आहेच.
मुंबईत सर्व सखल भागात आज सकाळी काही तासांतच कमरेपर्यंत पाणी साचले. यातून वाट काढणे अशक्य होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पालिका कर्मचाऱ्यांनी पावसाच्या पाण्यात तासन्तास उभे राहून नागरिकांना मदत केली. अंधेरी सबवेमध्ये 10 फूट पाणी साचले होते. यामुळेही येथील वाहतूक पूर्णपणे बंद होती. अंधेरी स्टेशन ते सबवे पर्यंतचा सर्व मार्ग जलमय झाला होता. एलबीएस मार्गावर 5 फूट पाणी साचले होते. वीरा देसाई मार्गही बंद झाला होता. भांडूप आणि कुर्ला स्थानकावर सकाळी 11 पर्यंतच पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद पडली. मध्य रेल्वे अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले की, वडाळा, कुर्ला, गोवंडी, सायन या स्थानकांवरील पाणी कमी करण्यासाठी 12 पंप लावले होते. मिठी नदीची धोक्याची पातळी 3.6 मीटर पर्यंत असल्याने रेल्वे रुळांवर 12 ते 13 इंच पाणी साचले होते. साधारणपणे रेल्वे रुळावर 6 इंच पाणी असल्यास रेल्वे सेवा सुरु असते. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवरून सेवा बंद ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून वांद्रे आणि गोरेगाव पर्यंतच्या तर मानखुर्द ते पनवेल हार्बर मार्गावरील रेल्वे सुरू होत्या.ठाणे-कसारा-कर्जत लोकल सुरू होत्या. याशिवाय ठाणे – वाशी ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-उरण ईस्ट फोर्थ लाईनच्या लोकल सुरू होत्या. अंधेरी लिंक रोड पाण्याखाली गेल्यानंतर मनसेने पाण्यात उभे राहून आंदोलन केले. मनसेचे वर्सोवा विभागाध्यक्ष संदेश देसाई यांनी आरोप केला की, गेले 3 दिवस या भागात पाणी साचत आहे. मात्र उपनगरचे पालकमंत्री इकडे फिरकलेही नाहीत. चेंबूर मार्केट पाण्याखाली गेले. तेथील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. ठाण्याच्या वंदना बस डेपो परिसरात पाणी साचल्याने पालिका कर्मचारी दोरखंडांच्या सहाय्याने लोकांना मार्ग पार करण्यास मदत करीत होते. भिवंडीत तुफान पाऊस होऊन दुकानात पाणी शिरले. नवी मुंबईच्या जुईनगर पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक बंद पडली. मुंब्र्यात पावसाचे पाणी नदीप्रमाणे रस्त्यावर वाहत होते. त्यात एक दुचाकीही वाहून गेली. नालासोपाऱ्यात सकाळीच कमरेपर्यंत पाणी साचले. पालिका नालेसफाई करीत नसल्याने दर पावसाळ्यात हा त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार नागरिक करत होते. विरारच्या युनिटेक सोसायटीत पावसाचे घाण पाणी घराघरांत शिरले होते. मुंबईची मिठी नदी आज धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली होती. यामुळे या नदीकाठी असलेल्या झोपड्यातील 400 जणांचे घाईने स्थलांतर करण्याची वेळ आली. मिठी नदीचा प्रवाह इतका वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात येऊन पाहणी केली आणि मिठी नदीची पातळी अधिक वाढल्यास उर्वरित हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आदेश दिले. यातच पवई फिल्टर पाडा येथे एक तरुण पाय घसरून मिठी नदीत कोसळला. त्याने एका खांबाला धरून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. लोकांनी दोरखंड सोडून त्याला मदत केली. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, हा तरुण तिथून वाहून गेला. सुदैवाने पुढे जाऊन तो फुले नगर परिसरात सापडला आणि त्याला रुग्णालयात दाखल केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे 10 लाख एकर शेतजमिनीतील उभे पीक पाण्याखाली गेले आहे. दोन दिवसांत त्याचे पंचनामे सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे कृष्णा आणि कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये एकमेकांच्या संपर्कात असून, एकमेकांना मदत करण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील धरणे ओव्हर फ्लो होत असल्याने विसर्ग कधी सुरू करायचा याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक धरणावर 24 तास कार्यकारी अभियंत्यांच्या दर्जाचा अधिकारी हजर ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले 24 तासांत 659 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यात वाईच्या महागणपतीला पाण्याचा वेढा पडला असून, मंदिरात पाणी शिरले आहे. कोल्हापुरात गेल्या 24 तासांत गगनबावडा परिसरात सर्वाधिक म्हणजे 261 मिमी पावसाची नोंद झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने त्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
मुंबईकडे येणारी विमाने वळवली
मुंबईकडे येणारी इंडिगो एअरलाईन्सची सहा विमाने तसेच स्पाईसजेट आणि एअर इंडियाच्या प्रत्येकी एका विमानाचे उड्डाण सुरत, अहमदाबाद आणि हैदराबादसह जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आले.
कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विमान उड्डाणे वळवण्यात आली. विमानतळ सूत्रांच्या मते, मुसळधार पाऊस कोसळत असतानाही कोणत्याही वेळी विमानतळाचे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले नव्हते.
मध्य रेल्वेच्या चार एक्स्प्रेस रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – एम. जी. आर. चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.
राजापूर, चिपळूणमध्ये शिरले पाणी
सततच्या मुसळधार पावसामुळे राजापूर, चिपळूणमध्ये पाणी शिरले. रायगडच्या रोह्यात कुंडलिका, तर नागोठाणेत अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये बाजारपेठेत पाणी शिरले. परशुराम घाटात धबधबे ओसंडून वाहत आहेत. वशिष्ठी, शास्री, जगबुडी, काजळी, गोदिवली या नद्यांनी इशारा पातळी गाठली. राजापूरच्या जवाहर चौकापर्यंत पाणी आले. सिंधदुर्गात वाघटन, गडनदीला पूर आला आहे.
वैभववाडी करूळघाट मार्गावर
वाहनांच्या लांबच लांब रांगा
तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कळे यादरम्यान ठिकठिकाणी पुराचे पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळपासूनच ठप्प झाली. करूळ चेकनाका येथे अनेक तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गगनबावडा ते कडे यादरम्यानच्या सांगशी, मांडुकली, असलज, खोकुर्ले, शेनवडे, किरवे, लोंघे या गावातून जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून राधानगरी मार्गे सुरू आहे.
दिल्लीत यमुना नदीला महापूर
धोक्याची पातळी ओलांडली
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील यमुना नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे. आज मंगळवारी पहाटे 5 वाजता यमुनेची पाण्याची पातळी 205.95 मीटर इतकी नोंदली गेली. ही पाणीपातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा जास्त आहे.
ही पाणीपातळी जुन्या रेल्वे पुलावर 205.36 मीटर होती. ही परिस्थिती राजधानीसाठी चिंतेचा विषय राहिली आहे. कारण धोक्याची पातळी 205.33 मीटर निश्चित करण्यात आली आहे. मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की, राष्ट्रीय राजधानीत मोठ्या प्रमाणात पूर येणार नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जलसंपदा मंत्री प्रवेश साहिब सिंह यांच्यासह यमुना आणि आसपासच्या भागांची पाहणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की परिस्थिती सुरक्षित आहे. पाणी साचण्याची समस्या फक्त सखल भागात मर्यादित असेल. सर्व विभाग रात्रंदिवस सतर्कतेने काम करत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.शहरातील प्रमुख ठिकाणी 14 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, जर पाण्याची पातळी 206 मीटरपेक्षा जास्त वाढली तर सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी
हलवले जाईल.
मुंबईतला पाऊस
सकाळपर्यंतच्या 24 तासांत (मिमी)
चिंचोली 361, दादर 300, वडाळा 282 , सायन 252, वरळी नाका 250, चेंबूर 297, विक्रोळी 287, विक्रोळी प. 293, पवई 290, मुलुंड 288, वर्सोवा 240, कांदिवली 337, दिंडोशी 305, मागाठाणे 304
मोनोरेल ठप्प! प्रवाशांना बाहेर काढले
मोनो रेल्वे सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले.
