Home / देश-विदेश / शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे भारतात कार्यालय? बांगलादेशचे आरोप सरकारने फेटाळले

शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे भारतात कार्यालय? बांगलादेशचे आरोप सरकारने फेटाळले

India Rejects Bangladesh Allegations

India Rejects Bangladesh Allegations: बांगलादेशमधील अंतरिम सरकारने भारतावर गंभीर आरोप करत देशातून अवामी लीगचे (Awami League) काम सुरू असल्याचा दावा केला होता. मात्र, आता यावर भारत सरकारने सडेतोड उत्तर देत हा दावा फेटाळून लावला आहे. (India Rejects Bangladesh Allegations)

अवामी लीग हा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आहे. शेख हसीना यांनी मागील काही महिन्यांपासून भारतात आश्रय घेतला आहे.

अवामी लीगने भारताच्या शहरांमध्ये कार्यालये सुरू केल्याने दोन्ही देशांच्या संबंधांना धोका निर्माण झाल्याचे बांगलादेशने म्हटले आहे. यावर भारताने अवामी लीगच्या भारतस्थित सदस्यांकडून कोणत्याही भारतविरोधी कारवायांची माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या हंगामी सरकारने हा आरोप केला आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात दिल्ली आणि कोलकातामध्ये ‘बंदी घालण्यात आलेल्या अवामी लीगची’ कार्यालये स्थापन झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “भारत सरकारला अवामी लीगच्या कथित सदस्यांकडून भारतात कोणत्याही बांगलादेशविरोधी कारवायांची माहिती नाही,” असे ते म्हणाले. भारत आपल्या भूमीतून कोणत्याही देशाविरोधात राजकीय कारवाया करू देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही देशांमध्ये तणावाचे कारण

मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये पदभार स्वीकारल्यापासून दोन्ही देशांमधील संबंधांमधील तणाव वाढला आहे.बांगलादेशातील हिंदूंवर आणि इतर अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशातील तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतल्याने देखील युनूस सरकारने वारंवार नाराजी व्यक्त केले आहे.

शेख हसीना यांच्यावर आरोप

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑगस्ट 2024 मध्ये ढाका सोडून भारतात आश्रय घेतला असून, सध्या त्या स्व-निर्वासनात (Self-exile) दिल्लीत राहत आहेत. बांगलादेशने त्यांना परत पाठवण्याची भारताकडे विनंती केली आहे, परंतु भारताने अद्याप त्यावर प्रतिसाद दिलेला नाही.

जुलैमध्ये, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणने हसीना यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर मानवता-विरोधी गुन्हे आणि गेल्या वर्षी निदर्शकांवर केलेल्या कारवाईचे आरोप आहेत.

हे देखील वाचा –

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा

इंडिया पोस्टचा ऐतिहासिक बदल! 5800 कोटींच्या गुंतवणुकीतून ‘अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ सुरू; जाणून घ्या वैशिष्ट्ये

सरकारचा मोठा निर्णय; लवकरच ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार? जाणून घ्या काय आहे नवीन विधेयक