Ladki Bahin Yojana beneficiaries: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत (Ladki Bahin Yojana beneficiaries) आता एक मोठा खुलासा झाला आहे. या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले असून, यामध्ये थेट सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.
विशेषतः जिल्हा परिषदेच्या1,183 महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. महिला व बालविकास विभागाने या कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषदेच्या अनेक महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योजनेसाठी ठरवलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही लाभ घेतला. त्यामुळे आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक काढले आहे.
कारवाईचे अधिकार सीईओंकडे
या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, जिल्हा परिषद ही एक स्वायत्त संस्था असल्यामुळे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे, या 1,183 कर्मचाऱ्यांवर ‘महाराष्ट्र नागरी सेवा’ नियमांनुसारकारवाई करून त्याचा अहवाल महिला व बालविकास विभागाला सादर करावा.
बोगस लाभार्थ्यांचा शोध
यापूर्वीच, एकाच घरात दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे सरकारने राज्यातील सुमारे 26 लाख महिलांची चौकशी सुरू केली आहे. याच चौकशीदरम्यान, जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनीही गैरप्रकारे योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईमुळे सरकारची तिजोरी रिकामी होत असल्याच्या आरोपांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेलाही एकप्रकारे उत्तर दिले जात आहे. आता या प्रकारच्या कारवाईमुळे योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्या सर्व बोगस लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा –
रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे ‘मोठे’ कारण? राहुल गांधींच्या विधानामुळे जोरदार चर्चा