Home / महाराष्ट्र / Fadnavis-Raj Thackeray: फडणवीस-राज ठाकरे 50 मिनिटे चर्चामात्र वाहतूक बेशिस्त-खोळंबा हाच विषय

Fadnavis-Raj Thackeray: फडणवीस-राज ठाकरे 50 मिनिटे चर्चामात्र वाहतूक बेशिस्त-खोळंबा हाच विषय

Fadnavis-Raj Thackeray spent 50 minutes discussing only traffic indiscipline and congestion.


नवी दिल्ली- ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांत तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सोबत होते. दोघांची दुसऱ्यांदा भेट झाल्याने चर्चांना उधाण आलेले असतानाच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाहतूक बेशिस्त व वाहतूक कोंडी यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले.
मुंबईच्या बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर उपायांचा आराखडा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे राज यांनी सांगितले. पण या भेटीने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले.
मुंबईच्या शहर वाहतूक नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांशी गेल्या काही महिन्यांपासून आपली चर्चा सुरू होती. त्याच अनुषंगाने आजची ही भेट असल्याचे राज म्हणाले. आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत राज यांनी भेटीचा वृत्तांत दिला. कबुतरे, कुत्रा, हत्तीसारख्या विषयात गुरफटल्याने शहर नियोजनासारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांचा पाळीव कुत्रा राज यांच्याजवळ येऊन बसला. बेस्ट पतपेढीतील निवडणुकीबाबत मला काहीच माहिती नव्हते, ती स्थानिक निवडणूक होती असे म्हणत त्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव झाल्याच्या चर्चेला महत्त्वच दिले नाही.
राज ठाकरे वाहतूक व्यवस्थेवरच प्रामुख्याने बोलत होते. ते म्हणाले, शहर नियोजन न केल्यास शहरे उद्ध्वस्त होतील. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे. जिथे 50 माणसे राहत होती, आता तिथे 500 माणसे आली आहेत. त्यांच्या गाड्या वाढल्या. कचरा वाढला. हे सर्व आता रस्त्यावर येत असून त्यामुळे शहराचा बट्ट्याबोळ होत आहे.यातून मार्ग काढण्याऐवजी नको तिथे भीती दाखवली जाते. अर्बन नक्षलसारख्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा शहर नियोजनाकडे लक्ष द्यावे. यावेळी राज यांनी म्हटले की, अदानींच्या घशात महत्त्वाच्या जमिनी घातल्या जात आहेत, धारावीत नक्की काय पुनर्विकास करणार आहेत?
मुंबईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आराखडा दिला. यामध्ये वाहतूक समस्या, पार्किंग व्यवस्था याबद्दल उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. मी तयार केलेल्या आराखड्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे सांगत ते पुढे म्हणाले की, काही दिवसांतच हा आराखडा अंमलात आल्याचे दिसेल. मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही यावेळी बैठकीला उपस्थित होते. राज पुढे म्हणाले, मुंबईत बेशिस्त आणि कायद्याला न जुमानण्याची वृत्ती वाढत चालली आहे. हाताबाहेर गेलेली ही परिस्थिती आताच नियंत्रणात आणली नाही, तर यावर कोणीच तोडगा काढू शकणार नाही. रस्ते बांधणे हा धंदा झाला आहे. खड्डे पडले की पुन्हा निविदा काढली जाते. हे करणारे आहेत त्यांनाच तुम्ही निवडून देता. दरम्यान, 2025 मध्ये फडणवीस आणि राज यांच्यामध्ये तीन भेटी झाल्या आहेत. जूनमध्येही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हाही मुंबईत दोघांमध्ये हॉटेलात एक गुप्त भेट झाली होती.
कबुतरांवरून जैनांना टोला
राज ठाकरे यांनी कबुतरखाना वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, घरात चार उंदीर झाले, तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात. माणसे मेलेली चालतात, कबुतरे मेली नाही पाहिजेत. आज रेल्वेखाली, खड्ड्यात माणसे जातात. माणसांपेक्षा कबुतरे महत्त्वाची आहेत का, असा सवालही ठाकरेंनी विचारला.