नवी दिल्ली – केंद्र सरकारने ( central govt) जुन्या वाहनांच्या नोंदणी शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांचा (15 years old vehicles) वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. मंत्रालयाने जाहीर केल्या अधिसूचनेनुसार, १५ वर्षांपेक्षा जुन्या मोटरसायकलच्या नोंदणीसाठी २,००० रुपये मोजावे लागतील. तीन चाकी वाहनांना ५,००० रुपये तर, कार, जीप, व्हॅन आणि वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरातील लहान ट्रक यांना १०,००० रुपये मोजावे लागतील.
परदेशातून भारतात आणलेल्या २ किंवा ३ चाकी वाहनांना २० हजार रुपये तर ४ चाकी वाहनांना ८० हजार रुपये भरावे लागणार आहेत. इतर मोठ्या वाहनांना १२ हजार रुपये भरावे लागणार आहेत. जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यांची देखभाल खर्चिक असल्याने, त्यांचा वापर कमी व्हावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांवर आर्थिक भार पडणार असला तरी, पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.