Home / News / पुण्यात गणेश विसर्जनाचा वादमिरवणूक आता ८ वाजता निघणार

पुण्यात गणेश विसर्जनाचा वादमिरवणूक आता ८ वाजता निघणार

https://www.navakal.in/uncategorized/ganesh-visarjan-procession-in-pune-will-now-start-at-8-am-marathi-news/

पुणे – पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीवरून पेटलेला वाद आज अखेर मिटला. दरवर्षी मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू होते. आता ती सकाळी ८ वाजता निघणार आहे. त्यानंतर इतर मंडळांचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. पुण्यातील गणेश मंडळांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

याबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी बैठक घेतली होती. त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर आज पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सर्किट हाऊस येथे बैठक घेतली. या बैठकीला मानाचे गणपती मंडळाचे प्रतिनिधी आणि मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने घेतला होता. त्यानंतर इतर मंडळांनी मानाच्या पाच गणपतींच्या आधी मिरवणूक सुरू करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा वाद चांगलाच पेटला होता.

आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मानाच्या पाच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक लवकर काढण्याचा निर्णय मान्य केला. बदललेल्या वेळेनुसार, पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंडळाची मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू होईल. मानाचे पाच गणपती सकाळी साडेनऊपर्यंत बेलबाग चौक पार करतील. त्यानंतर इतर गणेश मंडळांची मिरवणूक सुरू होईल.