Home / महाराष्ट्र / ‘कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही’; सेबीच्या धाडीनंतर अवधूत साठेंनी दिले स्पष्टीकरण

‘कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही’; सेबीच्या धाडीनंतर अवधूत साठेंनी दिले स्पष्टीकरण

SEBI Avadhut Sathe

SEBI Avadhut Sathe: भारतीय रोखे आणि विनिमय बोर्डाने (SEBI) महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट ट्रेनर आणि ‘फिनफ्लुएंसर’ अवधूत साठे (Avadhut Sathe) यांच्या ट्रेडिंग अकादमीवर छापे टाकले आहेत. नोंदणी नसलेल्या गुंतवणूक सल्लागार सेवा दिल्याप्रकरणी सेबीने ही कारवाई केली असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे यांनी बेकायदेशीरपणे 400 ते 500 कोटी रुपये कमावल्याचा संशय आहे.

या कारवाईनंतर आता अवधूत साठे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. NDTV प्रॉफिटच्या रिपोर्टनुसार, अवधूत साठे यांनी त्यांच्या अकादमीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक व्हिडिओ जारी करून विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण दिले आहे.

त्यांच्या संस्थेकडून कोणत्याही प्रकारच्या शेअर बाजारातील टिप्स किंवा सल्ला दिला जात नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, त्यांचे क्लासेस नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

सेबीची मोठी कारवाई (SEBI Avadhut Sathe)

सेबीने यापूर्वी अवधूत साठे यांच्या विरोधात आदेश जारी करण्याची योजना आखली होती, परंतु नंतर त्यांनी थेट छापे टाकण्याचा निर्णय घेतला. 20 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. या तपासणीत साठे यांच्या डिजिटल कंटेंटचीही पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, त्याआधी एका कार्यक्रमात सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी मुंबईत एका मोठ्या फिनफ्लुएंसरवर मोठी कारवाई झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी, सूत्रांनी तो फिनफ्लुएंसर अवधूत साठे असल्याचे सांगितले.

“आम्ही या उद्योगातील एका मोठ्या नावावर शोध मोहीम राबवली आहे. अशा कारवाईचा उद्देश महसूल गोळा करणे नसून, नियामकाचे लक्ष आहे हे दाखवून देणे आहे,” असे वार्ष्णेय म्हणाले.

सेबीच्या म्हणण्यानुसार, जे फिनफ्लुएंसर्स गुंतवणुकीवर हमी असलेले परतावे किंवा थेट गुंतवणूक करण्याचे सल्ले देतात, त्यांना सेबीची नोंदणी घेणे बंधनकारक आहे. मात्र, जे केवळ गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करतात, त्यांना नोंदणीची गरज नसते.


हे देखील वाचा –

‘आधार कार्ड’चा पुरावा ग्राह्य धरावा’, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना मोठा दिलासा

जीएसटीमध्ये आता 4 नव्हे तर फक्त 2 स्लॅब; मंत्रिगटाची मान्यता; वाचा काय होणार स्वस्त

Dream 11 ॲप कायमचे बंद होणार? ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे कोट्यावधीचा व्यवसाय धोक्यात, ‘या’ ॲप्सना मोठा फटका