Govinda-Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, सुनीता यांनी ‘व्यभिचार, क्रूरता आणि वेगळे राहणे या कारणांखाली घटस्फोट मागितला आहे.
या वर्षीच्या सुरुवातीपासूनच गोविंदा आणि सुनीता यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अलीकडेच, सुनीता आहुजा यांनी त्यांच्या एका व्हिडिओ व्लॉगमध्ये घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केले होते. त्यानंतर आता थेट कोर्टात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्याने या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
कोर्टात अनुपस्थित गोविंदा
सुनीता आहुजा यांनी हिंदू विवाह अधिनियम, 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), (ib) अंतर्गत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने 25 मे रोजी गोविंदाला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तेव्हापासून दोघेही वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोर्टात सुनीता नियमितपणे हजर राहत असताना गोविंदा मात्र अनुपस्थित आहे.
सुनीता झाल्या भावूक
आपल्या व्लॉगमध्ये सुनीता आहुजा महागौरी महालक्ष्मी मंदिरात गेल्या होत्या. तिथे त्या पुजारी यांच्याशी बोलताना भावूक झाल्याचे दिसले होते. “मी जेव्हा गोविंदाला भेटले, तेव्हा देवीकडे माझी त्याच्यासोबत लग्न व्हावे, असे मागितले होते. देवीने माझी ती इच्छा पूर्ण केली आणि मला दोन मुलेही दिली,” असे त्यांनी म्हटले.
“पण प्रत्येक सत्य सोपे नसते, आयुष्यात चढ-उतार येतच असतात. पण मला देवीवर इतका विश्वास आहे की, जे कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याला महाकाली बघून घेईल,” असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले.
काही महिन्यांपूर्वी गोविंदा आणि एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीच्या जवळीकतेमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, या अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.