वॉशिंग्टन- अमेरिकन सरकारने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आधीच्या 25 टक्क्यावर वाढीव 25 टक्के कर लादण्याची अधिकृत अधिसूचना आज जारी केली. भारत रशियाकडून तेलखरेदी थांबवत नसल्याने अमेरिकेने हा जादा कर लावण्याची धमकी दिली होती. उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 9.31 वाजल्यापासून हा एकूण 50 टक्के कर लागू होईल. या भरमसाठ करामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू अमेरिकेत महागणार आहेत. याचा जबर फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज अहमदाबाद येथे मारुती-सुझुकीच्या ई विटारा या नव्या मोटारीला हिरवा झेंडा दाखवत इलेक्ट्रिक मोटारी आणि बॅटरी उत्पादनाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना स्वदेशी धोरणाचा पुनरुच्चार केला. मात्र मारूती कंपनी भारतात उत्पादन करणार असली तरी ती जपानी कंपनी आहे.
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावण्यास सुरुवात केली आहे. जगातील अनेक देश अमेरिकन वस्तूंवर अवाच्या सव्वा कर आकारतात. याउलट अमेरिका या देशांच्या वस्तूंवर खूप कमी कर लावते. त्यामुळे अमेरिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. यासाठीच अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सगळ्या देशांवर जशास तसे कर लावण्याचे धोरण त्यांनी सुरू केले आहे. 3 एप्रिल रोजी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन विविध देशांवर लावलेल्या करांची यादी घोषित केली. त्यात भारतावर त्यांनी 27 टक्के कर लावला होता.
हा कर 8 एप्रिलपासून लागू होणार होता. परंतु नंतर भारत-अमेरिका व्यापार करार करण्यासाठी या कराला तीन महिन्यांची स्थगिती दिली. या काळात भारत-अमेरिका करार न झाल्याने ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कराची घोषणा केली. शिवाय अमेरिकेचे निर्बंध असतानाही भारत रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी करत असल्याने 6 ऑगस्ट रोजी दंड म्हणून भारतीय वस्तूंवर आणखी 25 टक्के कराची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर लावलेला एकूण कर 50 टक्क्यांवर गेला.
या करासाठी ट्रम्प यांनी दिलेली 21 दिवसांची मुदत आज संपली. या कराराच्या बाबतीत ट्रम्प कठोर भूमिका घेणार नाहीत, असे वाटले होते. परंतु आज ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लावण्याच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली. त्यामुळे उद्यापासून हा कर लागणार हे निश्चित झाले आहे. या अधिसूचनेत स्पष्ट म्हटले आहे की, हे वाढीव शुल्क भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने कारवाई म्हणून लावण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेने चीनलाही 104 टक्के दणदणीत कर लावला होता. आणखी 150 टक्के कर लावण्याची धमकी दिली होती. परंतु चीनने या धमकीला अजिबात भीक न घालता अमेरिकेवरही 125 टक्के कर लावला. हा नंतर स्थगित केला . 12 ऑगस्ट रोजी अमेरिकेने चीनवरील कराला 90 दिवसांची स्थगिती दिली. सध्या अमेरिकेचा चीनवर 30 टक्के कर, तर चीनचा अमेरिकेवर 10 टक्के कर आहे.
भारत अमेरिकेला औषधे, दूरसंचार उपकरणे, कपडे, दागिने निर्यात करतो. भारताची अमेरिकेला होणारी एकूण निर्यात 86.5 अब्ज डॉलर इतकी आहे. यापैकी 60 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आता 50 टक्के कर आकारण्याच्या कक्षेत येतील. यामध्ये कपडे, रत्ने आणि दागिने, कोळंबी, गालिचा आणि फर्निचर यांचा समावेश आहे. या सर्व उद्योगांवर संक्रांत येणार आहे. फक्त औषधे, इलेक्ट्रॉनिक आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या क्षेत्रांना कर आकारला जाणार नाही. या करामुळे गुजरातचा कापड उद्योग अडचणीत येणार आहे. अमेरिका हा घरगुती कापडाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. या कपड्यांच्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी 35 टक्के निर्यात एकट्या अमेरिकेला होते. या करवाढीमुळे सुरतच्या हिरे उद्योगाचेही मोठे नुकसान होणार असून अमेरिकेत भारतीय हिऱ्यांच्या किमती वाढल्याने त्यांची मागणी कमी होणार आहे. त्यामुळे भारतीय हिरे कामगारांवर बेकारीची वेळ येईल.
अमेरिकेच्या करासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच म्हणाले की, भारत दाबावापुढे झुकणार नाही. कितीही दबाव आला तरी तो झेलण्याची ताकद वाढवत जाईल . दुकानदार, शेतकरी, पशूपालक यांचे मी नुकसान होऊ देणार नाही.
मेक इन इंडिया! मेक फॉर द वर्ल्ड
पंतप्रधान मोदी यांनी आज मारुतीची ई विटारा ही ईलेक्ट्रिक कार आणि अहमदाबादमधील जपानी मालकीच्या मारुती-सुझुकीच्या हन्सलपूरस्थित प्रकल्पातील हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादन विभागाचे उद्घाटन केले. इथे मारुती सुझुकीच्या ईलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन केले जाणार आहे. ही कार जपान, युरोपसह जगभरातील देशांमध्ये पाठवली जाणार आहे. मोदी म्हणाले की, गणेशोत्सवाच्या उत्साहात भारताच्या मेक इन इंडिया यात्रेत एक नवीन अध्याय जोडला जात आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे आमच्या ध्येयाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. आजपासून भारतात बनवलेली मारूतीची इलेक्ट्रिक वाहने 100 देशांत निर्यात केली जातील. जगातील अनेक देशांत चालणाऱ्या ईलेक्ट्रिक वाहनांवर मेक इन इंडिया लिहिलेले असेल.
