PM Narendra Modi – अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयात कर वसुली सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. ते उद्यापासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर (China and Japan visit) असतील. २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत(India)-चीन(China)मधील लष्करी संघर्षानंतर पंतप्रधान हे पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे दोन्ही देशांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(US President Donald Trump) यांच्या परराष्ट्र धोरणामुळे भारत पुन्हा हिंदी-चीनी भाई भाई या नाऱ्याला अनुसरून चीनसोबत दीर्घकालीन हातमिळवणी करणार का हे महत्त्वाचे आहे.
१५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान २९ आणि ३० ऑगस्टला जपान दौऱ्यावर असतील. पंतप्रधान झाल्यापासूनचा नरेंद्र मोदींचा हा आठवा जपान दौरा आहे. जपानचे विद्यमान पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्याशी त्यांची ही पहिलीच भेट असेल. या दौऱ्यात संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या द्विपक्षीय भागिदारीवर चर्चा होईल.
यानंतर ३१ ऑगस्ट १ सप्टेंबरला पंतप्रधान तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला रवाना होतील. हा पंतप्रधान मोदींचा सहावा चीन दौरा असून सर्वाधिकवेळा चीन दौऱ्यावर जाणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत . आपल्या पहिल्या कार्यकाळातच पंतप्रधान मोदी पाचवेळा चीन दौऱ्यावर गेले होते. २०१५, २०१६, २०१७ मध्ये प्रत्येकी एकवेळा आणि २०१८ मध्ये दोनवेळा चीनला भेट दिली.
चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान , ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश असलेल्या शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) या प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना २००१ मध्ये करण्यात आली. २०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. २०२३ मध्ये इराणही एससीओमध्ये सामील झाला.
पंतप्रधान मोदींचा हा चार दिवसांचा दौरा भारताच्या दीर्घकालीन परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर भरमसाट आयात शुल्क लावले आहे. चीन आणि जपान हे दोन्ही देशांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणाला उत्तर देण्यासाठी या दौऱ्यातून मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा आहे.