RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. संघाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यंदा संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने दिल्लीत 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान विशेष कार्यक्रमाचे आयोजव करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
भागवत म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. भारताच्या लोकसंख्या धोरणानुसार सरासरी 2.1 मुले असणे योग्य आहे. पण गणितानुसार 2.1 म्हणजे 2 होते, तर जन्माच्या बाबतीत दोननंतर तीन असावे लागते. मला डॉक्टरांनी हे सांगितले आहे,” असे ते म्हणाले.
2.1 पेक्षा कमी प्रजनन दर असलेल्या समुदायांचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात येईल, असेही त्यांनी सांगितले. योग्य वयात विवाह करणे आणि तीन मुले असणे हे पालक आणि मुलांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ते पुढे म्हणाले की, वाढती लोकसंख्या एक वरदान ठरू शकते, पण त्याच वेळी ते एक ओझेही असू शकते. “आपल्याला सर्वांना जेवण द्यायचे आहे. म्हणूनच लोकसंख्या धोरण अस्तित्वात आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कुटुंबात तीन मुले असावीत, त्याहून अधिक नसावीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | RSS chief Mohan Bhagwat says, "India's policy on population suggests 2.1 children, which means three children in a family. Every citizen should see that there should be three children in his/her family…" pic.twitter.com/1GR2Gv3oWl
— ANI (@ANI) August 28, 2025
भारतातील घटता प्रजनन दर
भागवत यांचे हे विधान महत्त्वाचे आहे, कारण भारताने गेल्या वर्षी चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, जूनमध्ये जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) 2025 च्या लोकसंख्या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (total fertility rate) घटला आहे.
यापूर्वी नागपूरमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातही भागवत यांनी तीन मुलांच्या धोरणाचे समर्थन केले होते.
भाजप आणि संघाचे संबंध
याच पत्रकार परिषदेत भाजप (BJP) आणि संघाच्या संबंधांवर विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले की, “सगळं काही संघ निश्चित करतो, असं होऊच शकत नाही. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. मात्र, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे. म्हणूनच आम्ही काही निश्चित करत नाही. आम्ही निश्चित करत असतो, तर इतका वेळ लागला असता का?, असे ते म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
विरारमध्ये इमारत कोसळली! १७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी
नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण ! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन