Home / देश-विदेश / Activist Death : खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप

Activist Death : खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप

Activist Death : शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्या (Environmental activist)आणि वकील सरिता खानचंदानी (Sarita Khanchandani) यांच्या आत्महत्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. गुरुवारी आपल्या राहत्या सात मजली इमारतीवरून उडी मारून खानदंचानी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी (Purushottam Khanchandani)यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्थानिक नेत्यावर (UBT Leader) गंभीर आरोप केले आहेत. एका खोट्या केसमध्ये आपल्या पत्नीला अडकविण्याचा प्रयत्न करून तिचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न झाल्याने तिने आत्महत्या केली असा त्यांनी आरोप केला.

सरिता या ख्यातनाम पर्यावरणवादी म्हणून ओळखल्या जात. महाराष्ट्रात डीजेबंदीमध्ये (DJ sound-ban)त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या स्वच्छतेसाठी त्यांनी हिराली फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ उभारली होती. शहरातील प्रदुषणाविरोधात लढणाऱ्या त्या खंबीर कार्यकर्त्या होत्या. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्या पोलिसांना भाग पाडायच्या.

खानचंदानी यांनी आपल्या कुटुंबियांसह पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की मानसिक छळामुळेच आपल्या पत्नीचा जीव गेला. त्यामुळे या प्रकरणाचा न्यायालयाच्या निगराणीखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तपास करावा. एका घरगुती हिंसाचार प्रकरणात सरिता यांनी वकील म्हणून पीडित जिया गोपलानी यांना मदत केली. पतीने हाकलून दिल्यावर गोपलानी निराधार, बेघार झाल्या. त्यामुळे सरिता यांनी त्यांना आपल्या घराची खोली राहायला दिली. अन्नपाण्यासोबतच इतर मदतही पुरवली. कोर्टकज्ज्यानंतर गोपलानी यांना मासिक १५ हजार रुपयांची पोटगी सुरू झाली. त्यानंतर सरिता यांनी घर मोकळे करण्यास सांगितले. बदलापूर भागात घराचा शोध सुरू असून दोन महिन्यात सध्याचे राहते घर मोकळे करून देण्याचे आश्वासन गोपलानी यांनी सरिता यांना दिले होते, असा पुरुषोत्तम खानचंदानी यांचा दावा आहे.

ते पुढे म्हणाले, बुधवारी गोपलानी यांनी फोन करून तब्येत बरी नसल्याचे सरिता यांना सांगितले. रात्री पावणेबाराच्या सुमारास सरिता त्यांना भेटायला गेल्या. तेव्हा तिथे गोपलानी यांच्यासोबतच जवळपास २० जण उपस्थित होते. त्यांनी तिथे खानचंदानी यांच्या विरोधात व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर टाकला . सरिता यांना अडकवण्यासाठीचा हा कट होता. शेवटी पोलिसही घटनास्थळी आले. सरिता आणि जिया गोपलानी दोघांनीही आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. तिथून सरिता घरी परतल्या. त्याच रात्री उबाठाचे राजकारणी आणि इतरांना घेऊन गोपलानी यांनी पोलिसात धाव घेत सरिताविरोधात तक्रार दिली. या घटनेमुळे सरिताला मोठा मानसिक धक्का बसला. गुरुवारी सरिता पोलिसात गेली आणि नंतर घरी येऊन तिने थेट खाली उडी मारून जीव दिला, असा खळबळजनक आरोप पती पुरुषोत्तम यांनी केला.

खानचंदानी यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूच्या कटामध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनाही जबाबदार धरले. गोपलानी या काही आमच्या घरी भाडेकरू नव्हत्या. मानवीय दृष्टीकोनातून त्यांना घर राहायला दिले होते, असे त्यांनी सांगितले. या सगळ्या घटनेचा संबंध त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी स्वच्छतागृहाच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाच्या वादाशी जोडला. सरिता यांनीच या अतिक्रमणाविरोधात मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे अतिक्रमणाच्या जागेवर सुरू असलेल्या शिवसेना शाखेला टाळे ठोकावे लागले आणि जागा महापालिकेच्या ताब्यात द्यावी लागली.

दरम्यान, जिया गोपलानी (Jia Gopalani)यांनी मात्र खानचंदानी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. आपण सरिता यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत असल्याचा दावा केला आहे. सरिता यांनी आपल्या मर्जीनुसार न वागल्यास घरगुती हिंसाचाराची केस आपण लढणार नसल्याची धमकी आपल्याला दिल्याचा दावाही गोपलानींनी केला. बुधवारी मी कॉल उचलला नाही, म्हणून सरिता माझ्या घरी आल्या होत्या. घरी येऊन सरिता यांनी मला मारहाण केली. त्यानंतरच पोलिसात जाऊन मी तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिस उपायुक्त सचिन गोरे (Deputy Commissioner Sachin Gore)यांनी सांगितले, की गोपलानी यांच्या तक्रारीवरून आम्ही सरिता यांच्याविरोधात घरात बेकायदेशीरपणे शिरणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरिता यांच्या आत्महत्या प्रकरणात कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवणार आहोत. सध्या तपास सुरू असून तो पुढे जाईल तसे संबंधितांवर कारवाई केली जाईल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू

मराठा आंदोलकांसाठी ठाकरे सेनेकडून जेवण

मराठा समाज मागासलेला नाही! चंद्रकांत पाटलांचे विधान वादात