Home / लेख / भारताचे पहिले व्यावसायिक क्वांटम कॉम्प्युटर तयार; ‘या’ महत्त्वाच्या कामासाठी होणार उपयोग

भारताचे पहिले व्यावसायिक क्वांटम कॉम्प्युटर तयार; ‘या’ महत्त्वाच्या कामासाठी होणार उपयोग

India Quantum Computer: देशातील पहिले व्यावसायिक क्वांटम कॉम्प्युटर तयार करण्यात आले असून, बेंगळूरुच्या QpiAI India Pvt Limited या कंपनीने ही...

By: Team Navakal
India Quantum Computer

India Quantum Computer: देशातील पहिले व्यावसायिक क्वांटम कॉम्प्युटर तयार करण्यात आले असून, बेंगळूरुच्या QpiAI India Pvt Limited या कंपनीने ही मोठी कामगिरी केली आहे. या व्यावसायिक क्वांटम कॉम्प्युटरचा अनेक महत्त्वाच्या कामासाठी उपयोग केला जाणार आहे.

हे क्वांटम कॉम्प्युटर औषधांना प्रतिरोध करणाऱ्या जीवाणूंवर उपाय शोधण्यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करेल. याबाबत द प्रिंटने वृत्त दिले आहे.

क्वांटम कॉम्प्युटरचा उपयोग

हे अत्याधुनिक कॉम्प्युटर अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी वापरले जाईल. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे औषधनिर्मिती. आज जगभरातील वैज्ञानिक औषधांना प्रतिरोध करणाऱ्या जीवाणूंवर उपाय शोधत आहेत. क्वांटम कॉम्प्युटर अशा औषधांच्या संशोधनाला गती देऊ शकते. याशिवाय, लॉजिस्टिक्स (Logistics) आणि ऑटोमोटिव्ह (Automotive) सारख्या क्षेत्रांतही या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होईल.

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

सामान्य कॉम्प्युटर बिट्सवर काम करतात (शून्य आणि एक), तर क्वांटम कॉम्प्युटर क्वांटम बिट्सवर (qubits) काम करतात, जे एकाच वेळी शून्य आणि एक दोन्ही अवस्थेत असू शकतात. यामुळे हे कॉम्प्युटर एकाच वेळी अनेक शक्यतांचा विचार करून अत्यंत वेगाने आणि अचूकपणे प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. या कॉम्प्युटरचे रेफ्रिजरेटर वगळता सर्व भाग स्वदेशी बनावटीचे आहेत.

QpiAI चे संस्थापक आणि सीईओ नागेंद्र नागराजा यांच्या नेतृत्वात हे कॉम्प्युटर तयार करण्यात आले आहे.

ही कंपनी सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय क्वांटम मिशन (NQM) चा एक भाग आहे. कंपनी क्वांटम तंत्रज्ञान शिकवण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षणही देत आहे. भविष्यात क्वांटम कॉम्प्युटर ChatGPT प्रमाणे मोबाईलवर सहज उपलब्ध होतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.


हे देखील वाचा – Asia Cup 2025: भारत आणि UAE मधील सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या