ट्रम्प यांचा पुढाकार, मोदीही आशावादी!
India US Trade: भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर एकूण 50 टक्के आयात शुल्क लादले आहे. ज्याचा फटका भारताच्या सुमारे 85 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीला बसत आहे. यामुळे सध्या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुता आहे. यामुळे भारताने अखेर अमेरिकेशी पुन्हा व्यापार करारावर चर्चा सुरू करण्यास संमती दिली.
सोमवारी रात्री ट्रम्प यांनी मोदी हे आपले चांगले मित्र असल्याचे सांगत व्यापारातील अडथळ्यांवर चर्चा करणार असल्याचे सोशल मीडियावर मांडले. पाच तासांनी मोदींनीही चांगल्या कराराची वाट पाहत असल्याचे सांगत सकारात्मक संकेतांचे स्वागत केले.भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर एकूण 50 टक्के आयात शुल्क लादले आहे. ज्याचा फटका भारतीय निर्यातीला पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती भेडसावत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कमालीची कटुता आली आहे. त्यादरम्यानच सोमवारचा दिवस आशेची चांगली किरणे घेऊन येणारा ठरला.
दोन्ही देशांमध्ये आर्थिक तणाव असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केली. ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्पष्टपणे सकारात्मक संकेत दिले. ते म्हणाले की, मला हे कळवताना आनंद होत आहे की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात मी माझे खूप चांगले मित्र पंतप्रधान मोदींशी बोलण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की, दोन्ही महान देशांना चांगला करार संमत करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
5 तासांनी पंतप्रधान मोदींनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका चांगले मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला खात्री आहे की, आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीसाठी अमर्यादित संधीची दारे उघडतील. आमचे प्रतिनिधी या चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यासही उत्सुक आहे. आम्ही एकत्रितपणे दोन्ही देशांच्या जनतेसाठी एक चांगले आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करू.भारताने आपले अमेरिकेवर निर्यात अवलंबन कमी करण्यासाठी रशियाशी असलेली जुनी मैत्री आणखी मजबूत करण्याबरोबरच चीनशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला.
5 सप्टेंबर रोजी एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग एकत्र होते. त्यांना एकत्र पाहून ट्रम्प निराशा दाखवत म्हणाले की , रशिया आणि भारत आता चिनी छावणीत गेले आहेत. असे दिसते की आपण भारत आणि रशियाला गमावले आहे. आशा आहे की त्यांचे भविष्य चांगले असेल. त्यानंतर अवघ्या चार दिवसातच भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार करार चर्चा पुन्हा सुरू होत आहे.
एक महत्वाची घडामोड म्हणजे भारतासाठी लॉबिंग करणारे जॅसन मिल्लर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. अमेरिकेला भारतात सर्वच क्षेत्रात खुला प्रवेश हवा आहे. विशेषतः कृषी क्षेत्रात अमेरिकेला रस आहे. मात्र असा खुला प्रवेश दिला तर आपले उद्योग, व्यवसाय, निर्मिती यावर मोठा विपरित परिणाम होईल. यासाठी या प्रवेशाला लगाम घालणे आवश्यक आहे. या मुद्द्यावरच आधीची व्यापार चर्चा असफल ठरली होती .
मात्र ट्रम्प यांनी लागलेल्या शुल्कामुळे भारताचे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. त्यातून सुटकेसाठी शुल्क कमी होणे गरजेचे आहे. मात्र त्याकरिता व्यापार करारात अमेरिकेला काही सवलती देऊन ट्रम्प यांच्या काही मागण्या मान्य कराव्या लागतील. आता जी चर्चा सुरू झाली आहे त्यात भारताला ही कसरत करावी लागणार आहे. अमेरिकेला व्यापार करारात काही सूट देऊन त्या बदल्यात शुल्क कमी करून घेण्याचा भारताचा प्रयत्न राहील.
हे देखील वाचा –
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण