CRPF Letter to Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यांमध्ये वारंवार सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) केला आहे. या संदर्भात CRPF ने राहुल गांधी यांना एक पत्र पाठवले असून, त्यात सुरक्षेबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
CRPF ने पत्रात काय म्हटले आहे?
NDTV च्या रिपोर्टनुसार, CRPF च्या व्हीव्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही या पत्राची प्रत पाठवली आहे. त्यात राहुल गांधी परदेश दौऱ्यांवर जाताना कोणालाही माहिती देत नाहीत, असे म्हटले आहे.
त्यांनी गेल्या काही काळात इटली (30 डिसेंबर ते 9 जानेवारी), व्हिएतनाम (12 ते 17 मार्च), दुबई (17 ते 23 एप्रिल), कतार (11 ते 18 जून), लंडन (25 जून ते 6 जुलै) आणि मलेशिया (4 ते 8 सप्टेंबर) अशा अनेक देशांचे दौरे केले, ज्यात त्यांनी नियमांचे पालन केले नाही, असे पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे CRPF च्या ‘येलो बुक’मध्ये नमूद केलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
राहुल गांधी यांना सध्या Z+ सुरक्षा कवच आहे, ज्यामध्ये ऍडव्हान्स्ड सिक्युरिटी लायजन (ASL) देखील समाविष्ट आहे. ही सर्वात उच्च श्रेणीतील सुरक्षा असून, यात सुमारे 55 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. नियमानुसार, ASL अंतर्गत सुरक्षा कर्मचारी कोणत्याही ठिकाणी दौऱ्यावर जाण्याआधी स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधून पाहणी करतात. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे CRPF ने म्हटले आहे.
याआधीही घडल्या होत्या घटना
CRPF ने राहुल गांधींना सुरक्षेबाबत पत्र पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. 2022 मध्येही CRPF ने 2020 पासून 113 वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते.
2019 मध्ये केंद्र सरकारने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांची विशेष सुरक्षा गट (SPG) काढून घेऊन त्याजागी CRPF ची सुरक्षा दिली होती.
हे देखील वाचा – Charlie Kirk Death: चार्ली कर्क यांची अमेरिकेत हत्या, पण धक्का ट्रम्प यांना; असं का?