Pune bomb blast case – सन २०१२ मधील पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Pune bomb blast case) एक आरोपी फारूख शौकत बागवान याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला.या संबंधीच्या खटल्याची सुनावणी लांबल्याने आरोपीला बराच काळ कोठडीमध्ये व्यतित करावा लागला आहे. सबब घटनेतील अनुच्छेद २१ ने दिलेल्या मुलभूत अधिकाराच्या आधारे आरोपी जामिनासाठी पात्र ठरतो,असे महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने याप्रसंगी व्यक्त केले.
आरोपी बागवान याला २६ डिसेंबर २०१२ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो सुमारे १२ वर्षे ६ महिने कोठडीत आहे. न्या.अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बागवान याने कोठडीत व्यतित केलेला कालावधी सर्वसामान्य कालावधीहून फारच जास्त आहे,यावर बोट ठेवत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.
१ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यात पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. तर जंगली महाराज रोड येथे पेरून ठेवलेला एक बॉम्ब पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने निकामी केला होता.इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात यामागे होता,असा पोलिसांचा आरोप आहे.या प्रकरणी पोलिसांनी बागवानसह एकूण ९ संशयितांना अटक केली.या साऱ्यांवर दहशत पसरवण्यासाठी घातपाती कारवाया करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बागवानच्या वतीने अॅड मुबीन सोलकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
हे देखील वाचा –
मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना प्रभागनिहाय आरक्षण द्या; कोळी महासंघाची मागणी
शाहरुख-दीपिकाला कोर्टात दिलासा ह्युंदाई कारप्रकरणी चौकशी स्थगित