PM Modi Mother AI Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींना बिहारमधील काँग्रेसच्या सभेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच बिहार काँग्रेसने एक्सवर पोस्ट केलेल्या एआय व्हिडिओमुळे नवा वाद सुरू झाला आहे. या व्हिडिओत पंतप्रधानांच्या आई स्वप्नात येऊन त्यांना राजकारणात अजून किती घसरणार, असा सवाल विचारतात.
या व्हिडिओवरून भाजपाने काँग्रेसला गालीवादी म्हणत त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याची टीका केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असतानाच या व्हिडिओमुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे.
बिहार काँग्रेसने एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला, साहेबांच्या स्वप्नात आई आली आहे. हा मनोरंजक संवाद पहा, अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडिओत दिसते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दिसणारी एक एआय प्रतिकृती झोपण्याची तयारी करत आहे.
आजूबाजूला ईव्हीएम, मतदार यादी अशा नावाच्या सुटकेस ठेवल्या आहेत. मोदींची प्रतिकृती स्वतःचे कौतुक करत म्हणते की, आजचे मतदारचोरीचे काम झाले आहे. आता झोपायला जातो. झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नात दिवंगत मातोश्री हिराबेन मोदी यांच्यासारखी दिसणारी महिला येते. ती त्यांना फटकारल्याच्या सुरात म्हणते की, अरे बेटा, पहिले तर तू मला नोटबंदीच्या लांब रांगेत उभे केले. त्यानंतर तू माझे पाय धूत असतानाची रील बनवलीस. आता बिहारमध्ये माझ्या नावावर राजकारण करत आहेस. तू माझ्या अपमानाचे पोस्टर छापत आहेस. तू पुन्हा बिहारमध्ये नाटक करण्याचा प्रयत्न करत आहेस. राजकारणाच्या नावाखाली तू अजून किती घसरणार? त्यानंतर मोदींसारखी दिसणारी एआय प्रतिकृती झोपेतून दचकून उठते आणि व्हिडिओ संपतो.
साहब के सपनों में आईं "माँ"
— Bihar Congress (@INCBihar) September 10, 2025
देखिए रोचक संवाद 👇 pic.twitter.com/aA4mKGa67m
या व्हिडिओवर भाजपाने संताप व्यक्त करत काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपाने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींना काँग्रेस-राजदच्या मंचावरून शिवीगाळ झाली. आता त्यांच्या मातोश्रींचा व्हिडिओ तयार करून अपमान केला जात आहे. काँग्रेसवाल्यांनो काहीतरी लाज बाळगा, तुम्ही अजून किती खालच्या
थराला जाणार?
भाजपा खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की, राजकारण किती घाणेरडे होऊ शकते, हे राजद आणि काँग्रेस यांनी दाखवून दिले आहे. एखाद्याच्या दिवंगत मातोश्रींचा उपहास करणे आणि त्यांच्यावर चिखल उडवणे हे अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे. बिहारची जनता अशा पक्षांच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राजदला दारुण पराभवाचा सामना करावा लागेल.
भाजपा नेते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर हा व्हिडिओ रिपोस्ट करून लिहिले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान करत आहे. बिहारचे नागरिक आरजेडी आणि काँग्रेसला याबाबत योग्य उत्तर देतील. ते बिहारच्या माता-भगिनींवर केला जाणारा उपहास मान्य करणार नाहीत.
भाजपा नेते शहझाद पूनावाला यांनी एक्सवर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने अद्याप खंतही व्यक्त केलेली नाही. काँग्रेसने केवळ दोषींना योग्य ठरवले नाही, तर खोट्याचा बचाव केला. तारिक अन्वरही याचा बचाव करत आहेत. आता बिहार काँग्रेसने एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा पक्ष गांधीवादी नाही तर गालीवादी झाला आहे. महिला आणि मातृशक्तीचा अपमान ही काँग्रेसची ओळख आहे. जी व्यक्ती आता हयात नाही तिचा अपमान करणे अत्यंत लाजिरवाणे आहे.
राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन राठोड म्हणाले की, राजकारणात पकड गमावलेल्या पक्षांकडून अशा प्रकारच्या गलिच्छ युक्त्यांचा वापर केला जात आहे. कधी पंतप्रधानांच्या आईबाबत असभ्य भाषा वापरत आहेत, तर कधी असे व्हिडिओ शेअर करत आहेत. हे केवळ निंदनीयच नाही, तर लज्जास्पद आहे.
व्हिडिओवरून टीका झाल्यावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष राजद यांनी सारवासारव करत स्पष्टीकरण दिले की, हा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांच्यावर राजकीय व्यंगचित्र म्हणून बनवला होता. तो त्यांच्या कुटुंबाचा अपमान करण्यासाठी बनवला नव्हता.
जदयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा म्हणाले की, काँग्रेसकडून गांधीवादी विचारसरणीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. जो पक्ष पंतप्रधान आणि त्यांच्या आई देशात आदरणीय आहेत. त्यांचा अपमान करण्यास मागेपुढे न पाहणाऱ्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते?
राजदचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले, बिहारमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत, खुनांचे चक्र सुरू आहे, मातांच्या डोळ्यात अश्रू आहेत. भाजपा नेत्यांनाही ते अश्रू जाणवले पाहिजे. त्यांनी त्या मातांचा विचार केला पाहिजे ज्यांची मुले बेरोजगारीमुळे भटकत आहेत.
हे देखील वाचा – महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर