Maharashtra BSNL 4G: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) साठी राज्यात तब्बल 930 गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जमीन वाटप करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
महसूल आणि वन विभागाने याबाबत गुरुवारी अधिकृत आदेश जारी केला आहे.
200 स्क्वेअर मीटर जमीन मोफत
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हा निर्णय 29 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पूर्वीच्या निर्णयानंतर घेण्यात आला होता, ज्यानुसार प्रत्येक टॉवरसाठी 200 स्क्वेअर मीटर जमीन विनाशुल्क (मोफत) दिली जाणार आहे.
BSNL ने दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये 4G कव्हरेज वाढवण्यासाठी ‘ग्राउंड-बेस्ड टॉवर्स’ आणि ‘इक्विपमेंट’ बसवण्यासाठी ही जमीन मागितली होती.
यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये 2,751 गावांमध्ये टॉवर उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती, पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक ठिकाणी टॉवर बसवता आले नाहीत. त्यामुळे BSNL ने 930 गावांची सुधारित यादी सादर केली, ज्याला आता सरकारने मंजुरी दिली आहे.
30 जिल्ह्यांमध्ये 4G कव्हरेज वाढणार
सरकारच्या आदेशानुसार, या 930 गावांचा समावेश 30 जिल्ह्यांमध्ये आहे. यात प्रामुख्याने परभणी (73), नांदेड (70), लातूर (67), यवतमाळ (63), अमरावती (61), नाशिक (60) आणि रायगड (65) या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने टॉवर उभारले जाणार आहेत.
याशिवाय, आदिवासी भागातील गडचिरोली (48) आणि पालघर (14) येथील गावांचाही यात समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांना येत्या 15 दिवसांत या प्रकल्पाला मंजुरी देऊन वीजपुरवठा आणि फायबर केबल्ससाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा – सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; Gen Z ने Discord वरून केली निवड; हा प्लॅटफॉर्म नक्की काय आहे?