Nitin Gadkari: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चर्चेत आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून त्यांच्यावर टीका होत आहे. आता या वादावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्या मेंदूची किंमत 200 कोटी रुपये आहे, असे सांगत त्यांनी आपल्याला प्रामाणिकपणे पैसे कसे कमावायचे हे माहित आहे, असे म्हटले आहे. ‘माझ्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि मी कधीच खालच्या पातळीवर जाणार नाही,’ असेही गडकरी म्हणाले.
नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला काय वाटते, मी हे पैशांसाठी करतोय का? मला प्रामाणिकपणे पैसे कसे कमवायचे हे माहित आहे. मी कुठलाही ‘व्हील-डीलर’ नाही.
इथेनॉल धोरणावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर
काँग्रेसने सरकाराच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणावर ‘हितसंबंधांचा संघर्ष’ असल्याचा आरोप केला होता. यावर भाजपने काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावले होते. गडकरींनी यावर बोलताना इथेनॉल उत्पादनाचे समर्थन केले. पुणे येथे एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, देशातील साखर उद्योग इथेनॉलमुळेच टिकून आहे. ‘इथेनॉलमुळे आपण 22 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतोय. आज देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने केवळ इथेनॉलमुळे वाचले आहेत,’ असे गडकरींनी म्हटले.
दरम्यान, E20 इंधनाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, विशेषतः त्याचा वाहनांवर होणारा परिणाम आणि मायलेजमध्ये होणारी घट. अनेक लोकांनी मायलेजमध्ये 20 टक्के घट झाल्याचा दावा केला होता.
मात्र, गडकरींनी यावर प्रतिक्रिया देताना, 20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर (E20) सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा ‘पैसे घेऊन चालवलेली मोहीम’ असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, वाहन उद्योगासह सर्व संबंधितांसोबत E20 वर स्पष्टता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणीला आव्हान देणारी PIL फेटाळल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.
हे देखील वाचा – Pahalgam Attack: शहिदांच्या कुटुंबांचा आक्रोश-आंदोलन! तरीही भारत-पाक सामना झाला