Mohone Cement Plant: मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याणजवळ असलेल्या मोहोने गावात अदानी ग्रुपच्या अंबुजा सिमेंट लिमिटेडच्या प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्लांटला जोरदार विरोध होत आहे. या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी मुख्य चौकात पोस्टर्स लावून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ अदानी ग्रुपचा हा दुसरा प्रकल्प आहे, ज्याला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे.
स्थानिकांचा विरोध का?
मोहोने गाव हे दाट लोकवस्तीचे असून, तिथे अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. अशा ठिकाणी सिमेंट प्लांट उभारल्यास आरोग्यासह हवेच्या शुद्धतेवरही परिणाम होईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
2020 मध्ये अदानी ग्रुपने नॅशनल रेयॉन कंपनीचे (एनआरसी) अधिग्रहण केले, तेव्हा तिथे जागतिक दर्जाचा लॉजिस्टिक्स पार्क उभारला जाईल असे सांगण्यात आले होते. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले होते. मात्र, लॉजिस्टिक्स पार्कऐवजी सिमेंट ग्राइंडिंग प्लांट उभारला जात असल्यामुळे स्थानिक रहिवासी नाराज झाले आहेत.
मोहोने आणि इतर सुमारे 10 गावांच्या ग्रामस्थांनी 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) आयोजित केलेल्या जनसुनावणीपूर्वीच स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ग्रामस्थ मंडळ मोहने कोळीवाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक नेते सुभाष पाटील म्हणाले, “हा केवळ पहिला टप्पा आहे. प्लांटमुळे होणारे वायू आणि जलप्रदूषण, वाढणाऱ्या रहदारीमुळे होणारी हानी, तसेच आरोग्याच्या समस्या यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.”
मुख्यमंत्री, मंत्र्यांना पत्रव्यवहार
स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून आपले आक्षेप नोंदवले आहेत. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडळ योग्य प्रक्रिया पाळत असून ज्यांना आक्षेप आहेत, ते जनसुनावणीमध्ये आपली मते मांडू शकतात.
प्रस्तावानुसार, एकूण 26.13 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यापैकी 9.67 हेक्टर जागा ग्रीन बेल्टसाठी राखीव असून 5.49 हेक्टर जागेवर ग्राइंडिंग युनिट, स्टोरेज आणि पॅकिंग प्लांटची उभारणी केली जाईल.
10 किलोमीटरच्या अभ्यास क्षेत्रात कल्याण तालुक्यातील 38 गावे, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांमधील गावे येतात, जिथे सुमारे 14,82,478 लोकसंख्या आहे.
हे देखील वाचा – 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड; साताऱ्यात पार पडणार कार्यक्रम