ITR filing Deadline: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणाऱ्या करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2024-25 साठी (आर्थिक वर्ष 2025-26) ITR भरण्याची (ITR filing Deadline) अंतिम मुदत एक दिवसाने वाढवून 16 सप्टेंबर 2025 केली आहे. करदात्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे CBDTने जाहीर केले आहे.
ITR filing Deadline: मुदतवाढ का मिळाली?
15 सप्टेंबर रोजी टॅक्स रिटर्न भरताना काही व्यावसायिकांना सोशल मीडियावर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टलमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी 16 सप्टेंबरच्या रात्री 12:00 ते 02:30 पर्यंत पोर्टल मेंटेनन्स मोडमध्ये ठेवले.
या अडचणींमुळेच एक दिवसाची वाढीव मुदत देण्यात आली आहे. CBDT ने यापुढे मुदत वाढण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले आहेत.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 कोटींहून अधिक ITR दाखल झाले आहेत. आयकर विभागाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून करदात्यांचे आणि कर व्यावसायिकांचे आभार मानले आहेत. ज्या करदात्यांनी अद्याप ITR दाखल केलेले नाही, त्यांना तातडीने ते भरण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.
ITR Late Filing Penalty: अंतिम मुदत चुकल्यास काय होणार?
जर तुम्ही 16 सप्टेंबरपर्यंत ITR दाखल करू शकला नाहीत, तर तुम्हाला विलंबित ITR दाखल करण्याची परवानगी आहे. हे तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत करू शकता, परंतु यासाठी दंड लागतो.
उत्पन्न कर कायदा 234F नुसार, जर तुमचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल, तर 1,000 रुपयांचा दंड आकारला जातो. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा दंड 5,000 रुपयांपर्यंत वाढतो.
याव्यतिरिक्त, जर तुमचा कोणताही कर थकलेला असेल, तर उत्पन्न कर कायदा 234A नुसार, तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 1 टक्का साधा व्याजदर भरावा लागतो. तसेच, वेळेत ITR न भरल्यास तुम्ही काही टॅक्स बेनिफिट्स आणि डिडक्शन्स गमावू शकता. कॅपिटल लॉस किंवा बिझनेस लॉससारखे नुकसान पुढील वर्षांसाठी पुढे नेता येत नाही. तसेच, तुम्हाला टॅक्स रिफंड मिळण्यासही विलंब होऊ शकतो.
हे देखील वाचा – अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेवर नियुक्ती; रोहित पवारांच्या उपरोधिक टीकेमुळे वाद