Dashavatar Marathi movie: अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतील दशावतार (Dashavatar Movie) या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सध्या महाराष्ट्रभर या चित्रपटाचीच चर्चा आहे.
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाच्या टीमने एक खास सरप्राइज दिले आहे. आता मंगळवारी (16 सप्टेंबर) दशावतार चित्रपटाचे तिकीट प्रेक्षकांना फक्त 99 रुपयांत मिळणार आहे. काही निवडक शहरांमध्येच ही ऑफर लागू असेल, असेही सांगण्यात आले आहे.
प्रेक्षक आता अवघ्या 99 रुपयांमध्ये हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. मात्र, दुसरीकडे चाहत्यांनी तिकीटाची किंमत कमी करू नये असेही म्हटले आहे. चित्रपट चांगला चालला आहे, त्यामुळे अधिक कमाई होईल, असे चाहते म्हणत आहेत.
दशावतारची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई (Dashavatar box office Collection)
दशावतार चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 5.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 12 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने पहिल्याच दिवशी 58 लाख रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी 1.39 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 2.72 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाची ही घोडदौड सोमवारीही सुरूच राहिली, या दिवशी चित्रपटाने 1.01 कोटी रुपये कमावले. दशावतारने यंदा प्रदर्शित झालेल्या गुलकंदसारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
सिनेमाची स्टारकास्ट
सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी दशावतारी कलाकार बाबुलीची मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनील तावडे आणि विजय केंकरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांनी केली असून, अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.
हे देखील वाचा – ‘नियमांचे पालन केले जात असेल तर…’; ‘वनतारा’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय