Satara News : साताऱ्यात एक विलक्षण आणि दुर्मिळ घटना घडली आहे. मूळची पुणे जिल्ह्याच्या सासवड येथील रहिवासी असलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय 27) या महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे.
विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी तिला तिळे झाले होते, त्यामुळे आता ती एकूण सात मुलांची आई बनली आहे. तिच्या कुटुंबात आता तीन मुली आणि चार मुलांचा समावेश आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील सासवड येथे स्थायिक असलेले विकास खाकुर्डिया आणि त्यांची पत्नी काजल यांना आधीच 5 वर्षांची जुळी मुले (ओंकार, खुशी) आणि 3 वर्षांचा एक मुलगा (नेहा) अशी तीन अपत्ये आहेत. दुसऱ्यांदा गरोदर असताना तपासणीमध्ये त्यांना तिळे होण्याचा अंदाज होता. मात्र, प्रसूतीसाठी साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांना गर्भात तब्बल चार बाळं असल्याचे लक्षात आले. या चौघांमध्ये एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश आहे.
कठीण प्रसूतीची यशस्वी शस्त्रक्रिया
या महिलेची प्रसूती करणे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सदाशिव देसाई, डॉ. तुषार मसराम यांच्यासह डॉ. नीलम कदम, डॉ. दिपाली राठोड पाटील आणि इतर वैद्यकीय पथकाने सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे ही अवघड प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. सध्या आई आणि चारही बाळं सुखरूप आणि ठणठणीत आहेत.
कुटुंबाची पार्श्वभूमी आणि आर्थिक आव्हान
विकास खाकुर्डिया हे मिळेल तिथे मजुरी किंवा गवंडी काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी त्यांनी ही मुले हवी असल्याचा आग्रह धरला होता.
सात मुलांच्या कुटुंबाचा खर्च कसा भागवणार असे विचारले असता, त्यांनी मजुरी करून त्यांचा खर्च भागवणार असल्याचे सांगितले. त्यांच्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाइकांनीही त्यांना ‘सात मुले म्हणजे देवाचा प्रसाद आहे, देवच त्यांना सांभाळेल’ असे सांगत दिलासा दिला आहे.
या घटनेवर बोलताना डॉक्टरांनी हे अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले. 70 लाख ते 5 कोटी प्रसूतींमध्ये अशी एखादी केस पाहायला मिळते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सदाशिव देसाई यांनी नमूद केले. ही घटना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही पात्र ठरू शकते, अशी चर्चाही साताऱ्यात सुरू आहे.
हे देखील वाचा – ‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, आता अवघ्या 99 रुपयात पाहा चित्रपट; प्रेक्षकांसाठी खास ऑफर