Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंपाकावरून झालेल्या वादातून एका पतीने बेसबॉल बॅटने मारहाण करून आपल्या हेड कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
नेमकं काय घडलं?
रिपोर्टनुसार, सीधी जिल्ह्यातील पोलीस वसाहतीत हेड कॉन्स्टेबल सविता साकेत त्यांच्या पती वीरेंद्र आणि दोन मुलांसह राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार रात्री त्यांच्यात स्वयंपाकावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, वीरेंद्रने बेसबॉल बॅट घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून बेसबॉल बॅट जप्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रिवा रेंजचे DIG हेमंत चौहान आणि पोलीस अधीक्षक संतोष कोरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सविता साकेत कामरजी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.
हेड कॉन्स्टेबल सविता साकेत यांच्या निधनामुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. पोलीस विभागाकडून त्यांना शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “ही घटना अत्यंत दुःखद आहे आणि पोलीस विभागासाठी हे एक मोठे नुकसान आहे. आम्ही पीडितेच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत दिली आहे. भविष्यातही जे काही लागेल, ते सर्व सहकार्य केले जाईल. आरोपीला लवकरच अटक केली जाईल आणि यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले आहेत.”
सविताच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आई-वडिलांमध्ये स्वयंपाकावरून वाद झाला होता. तिने शेजाऱ्यांना याबद्दल माहिती दिली, पण ते पोहोचेपर्यंत तिचा ‘वडील’ पळून गेला होता.
हे देखील वाचा – UPI लवकरच ATM चे काम करणार; QR कोड स्कॅन करून पैसे काढणे शक्य होणार