Red Paint on Meenatai Statue – No CCTV Footage! Accused Arrested
Red Paint on Meenatai Statue – मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची आज सकाळी अज्ञात व्यक्तीने लाल ऑईलपेंट रंग फेकून विटंबना केली. या खळबळजनक घटनेमुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले. उद्धव ठाकरे,(Uddhav Thackeray ) राज ठाकरे ( Raj Thackeray)यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसे आणि उबाठाचे(UBT) कार्यकर्ते जमले. पण दोघा नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्याने स्थिती चिघळली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या स्मृतीस्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्हीत (CCTV Footage)हा पुतळाच दिसत नाही. मात्र पोलिसांनी याप्रकरणी ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ उपेंद्र पावसकर याला रात्री अटक केली आहे.
असाच महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी उद्देश असू शकतो. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आम्ही सर्वांना शांत राहायला सांगितले आहे. त्यांच्यासोबत आलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली की, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणे हा मूर्खपणा आहे. निवडणुका तोंडावर असताना वातावरण बिघडवण्याचा हेतू असलेल्या घटकांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.उबाठाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी पोलिसदेखील दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6.10 मिनिटांपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 मिनिटांनंतर झाली असावी.उबाठा खासदार अनिल देसाई म्हणाले की, कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला. या समाजकंटकी किंवा भेकडांवर कुठले संस्कार नक्कीच झालेले नसतील. पण राज्यातील पोलीस यंत्रणा आणि सरकार काय करत आहे? ही निषेध करण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. सरकारचे अपयश प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसते. अशा समाजकंटकांना आणि भेकाडांना आजच्या प्रकाराचे प्रत्युत्तर मिळेल. शिवसैनिकांनी पुतळा परिसर स्वच्छ केला आहे. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असा प्रकार घडतो यावरून मुंबई सुरक्षित नसल्याचे दिसते. सरकार भलत्यासलत्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल आहे. आजची घटना म्हणजे सरकारचे अपयश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याला सोडले जाणार नाही. तर शिंदे गटाचे नेते व गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, आमच्यासाठी हा भावनिक विषय आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या घटनेचा निषेध करीत कडक कारवाई केली जाईल असे सांगितले.दरम्यान पुतळ्यावर रंग फेकणार्या उपेंद्र पावसकरला 12 तासांच्या आत पोलिसांनी अटक केली. उपेंद्र आणि त्याचा चुलत भाऊ असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संपत्तीचा वाद होता. या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप उपेंद्रने केला. या रागातूनच हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.
2006 मध्ये याच पुतळ्याची विटंबना झाली होती
9 जुलै 2006 रोजी याच पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने माती फेकून विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मुंबई, ठाणे, मालेगाव, नाशिक, पुण्यासह राज्यभर आंदोलने केली होती. बस, टायर जाळले होते.
हे देखील वाचा –
मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया