Jadhav Committee – त्रिभाषा सूत्रावर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यभर दौरा करण्यात येणार असल्याचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या (Dr. Narendra Jadhav Committee)पहिल्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दौऱ्यानंतर मुंबईत एक अंतिम बैठक आयोजित करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्यासह प्रमुख नेत्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत ५ डिसेंबरआधी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा (Hindi compulsory) निर्णय शिवसेना (UBT), मनसे (MNS)यांच्या प्रचंड विरोधानंतर रद्द केला होता. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy) २०२० अंतर्गत त्रिभाषा धोरण ठरवण्यासाठी शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात आली होती. मंत्रालयातील बैठकीत कामकाजाची दिशा ठरवण्यात आली.
या बैठकीनंतर डॉ. जाधव यांनी सांगितले की, जनमत जाणून घेण्यासाठी लोकांशी थेट चर्चा केली जाईल. त्यासाठी राज्यभर दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आठ शहरांना भेटी दिल्या जातील. ८ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar)या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर १० ऑक्टोबरला नागपूर, ३० ऑक्टोबरला कोल्हापूर, ३१ ऑक्टोबरला रत्नागिरी, ११ नोव्हेंबरला नाशिक, १३ नोव्हेंबरला पुणे आणि २१ नोव्हेंबरला सोलापूर दौरा आहे.
ते पुढे म्हणाले की, त्रिभाषा धोरण लागू करताना राज्यातील १ लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांचे हित ध्यानात घेऊन सर्वांगिण अहवाल तयार केला जाईल. समिती थेट लोकांसोबत चर्चा करणार आहे, तसेच ऑनलाईन पद्धतीने जनमत जाणून घेण्यात येईल. यासाठी येत्या १५ दिवसांत संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. दोन प्रश्नावली तयार करण्यात येणार आहेत. एक जनतेसाठी, दुसरी अभ्यासकांसाठी असेल.
हे देखील वाचा –
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ; सुटलेल्या ७ जणांना नोटीस
मुंबईचा महापौर मराठीच ; मनसेचे भाजपाला प्रत्युत्तर
तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद