Maharashtra Doctors Strike: राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) नोंदणी करण्याची परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील 1.8 लाख डॉक्टर गुरुवारी (18 सप्टेंबर) 24 तासांच्या संपावर गेले होते.
ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न फार्माकोलॉजीचा एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स (CCMP) पूर्ण केला आहे, त्यांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
नेमके कारण काय आहे?
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 1.8 लाख ॲलोपॅथी डॉक्टर्स ज्यात खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचाही समावेश होता. ते सर्व या संपात सहभागी झाले होते.
डॉक्टरांच्या संघटनांनी म्हटले आहे की, होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला परवानगी देण्याचा हा निर्णय रुग्णांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्य सेवांच्या गुणवत्तेसाठी गंभीर धोका आहे. या वर्षीच्या सुरुवातीला राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला (MMC) निर्देश दिले होते की, ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न फार्माकोलॉजीचा सर्टिफिकेट कोर्स (CCMP) पूर्ण केला आहे, त्यांना विशिष्ट परिस्थितीत ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी द्यावी.
यापूर्वीही झाला होता विरोध
सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रच्या सदस्यांनी 11 जुलै रोजीच संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यावेळी सरकारने अधिसूचनाही मागे घेतली होती. मात्र, 5 सप्टेंबर रोजी सरकारने पुन्हा एकदा एक नवीन जीआर जारी करून ही नोंदणी प्रक्रिया सुरू केली, ज्यामुळे ॲलोपॅथी डॉक्टर्स संतापले आणि त्यांनी 24 तासांचा संप पुकारला.
अत्यावश्यक सेवा सुरू होत्या
या आंदोलनात सरकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व निवासी डॉक्टरांच्या संघटना, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असोसिएशन यांसारख्या संघटना सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, सर्व तातडीच्या आणि गंभीर सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
हे देखील वाचा – अदानी समूहाला ‘क्लीन चिट’; हिंडेनबर्गचे सर्व आरोप SEBI ने फेटाळले, गौतम अदानी म्हणाले…