Mumbai Underground metro: मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन (Metro Line 3) अखेर पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी या मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा शेवटचा टप्पा वरळी ते कफ परेड असा 10.99 किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामुळे मुंबईतील प्रवासाला एक नवीन गती मिळणार आहे.
नेमका मार्ग आणि खर्च
आक्वा लाईन म्हणून ओळखली जाणारी ही मेट्रो लाईन 33.5 किमी लांबीची असून, उत्तरेकडील आरे ते दक्षिणेकडील कफ परेडला जोडते. यात एकूण 27 स्थानके आहेत. हा प्रकल्प 2011 मध्ये पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आला होता, परंतु बांधकाम जानेवारी 2017 मध्ये सुरू झाले.
सुरुवातीला 23,136 कोटी रुपये अंदाजित खर्च होता, जो आता वाढून 37,276 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या प्रकल्पासाठी 60% निधी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (JICA) दिला आहे, तर उर्वरित निधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने 50:50 च्या संयुक्त भागीदारीतून खर्च केला आहे.
प्रवासाचा वेळ आणि तिकिटाचे दर
ही मेट्रो लाईन सुरू झाल्यावर, दररोज सुमारे 13 लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. यामुळे मुंबईच्या उत्तर-दक्षिण प्रवासाला एक जीवनवाहिनी मिळेल. पूर्ण प्रवास (कफ परेड ते आरे) करण्यासाठी रस्तामार्गे 90 ते 100 मिनिटे लागतात, पण मेट्रोने हा प्रवास अवघ्या 54 मिनिटांत पूर्ण होईल.
मेट्रोचे भाडे 10 ते 70 रुपये असेल, जे टॅक्सीच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर होणार आहे.
सुरुवातीला कमी प्रतिसाद का मिळाला?
यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये आरे ते बीकेसी आणि मार्च 2025 मध्ये बीकेसी ते वरळीपर्यंतचा टप्पा सुरू झाला होता. त्यावेळी दररोजची प्रवासी संख्या अनुक्रमे 20,000 आणि 37,000 होती. अधिकाऱ्यांनी यामागचे कारण अपूर्ण कनेक्टिव्हिटी आणि इतर उपनगरीय रेल्वे किंवा मेट्रो लाईनशी जोडणीचा अभाव असल्याचे सांगितले होते.
आता संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतरप्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे 2055 पर्यंत दररोज 31.5 लाख प्रवाशांचे उद्दिष्ट आहे.
हे देखील वाचा – लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद