Home / News / Corruption Shakes Maharashtra : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार उघड! व्हिडिओ, फोटो व्हायरल महेंद्र दळवी आणि नोटा! काम न करता मोबदला

Corruption Shakes Maharashtra : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार उघड! व्हिडिओ, फोटो व्हायरल महेंद्र दळवी आणि नोटा! काम न करता मोबदला

Corruption Shakes Maharashtra – महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे दोन व्हिडिओ आज प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर एक धक्कादायक फोटोही व्हायरल झाला. उबाठाचे...

By: Team Navakal
Corruption Shakes Maharashtra
Social + WhatsApp CTA


Corruption Shakes Maharashtra – महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे दोन व्हिडिओ आज प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर एक धक्कादायक फोटोही व्हायरल झाला. उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांच्या बंडलांसह असलेला व्हिडिओ सार्वजनिक केला.

तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी लाचखोरीचे पैसे घेऊन कार्यालयाच्या ड्रॉवरमध्ये ते पैशाचे पुडके ठेवतानाचा व्हिडिओ जारी केला. या दोन्ही व्हिडिओंमुळे सरकारचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा पुराव्यासहित उघडकीस आला असल्याचा दावा दानवे आणि देशपांडे यांनी केला.

त्याचवेळी सरकारमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे हे जणू अधोरेखित करीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर शहरात विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी त्यांच्या टेबलवर ‘मी माझ्या पगारात समाधानी आहे‘ अशी पाटी लावल्याचा फोटो व्हायरल झाला.

आज एवढे आरोप होऊनही जणू काही झालेच नाही, अशा रीतीने विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज चालू राहिले. सरकारी नोकरांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांकडून भ्रष्टाचाराच्या खोक्यांचे हे उघड आणि निर्लज्ज प्रदर्शन धक्कादायक आहे. पण त्यानंतरही सरकार काही उत्तर देत नाही आणि विरोधक तो विषय रेटत नाहीत हे चित्र आणखी भयानक होते.

10 कंत्राटदारांवर फुकट खैरात
बांधकाम खात्यावर संदीप देशपांडेंचा आरोप


मनसे नेते संदीप देशपांडेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हाफकिन शाखेतील (पीडब्ल्यूडी) भ्रष्टाचाराची पोलखोल केली. त्याचा व्हिडिओ पोस्ट करून खळबळ माजवली. या व्हिडिओत या खात्याचा एक अभियंता पीडब्ल्यूडीच्या कार्यालयातच उघडपणे कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसत आहे.

पैसे घेऊन ते तिथेच ड्रॉवरमध्ये त्याने ठेवले. याच व्हिडिओत देशपांडे यांनी पीडब्ल्यूडीने 10 कंत्राटदारांना काम न करता पैसे दिल्याचा आरोपही केला आहे. हा या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ असून, उद्या दुसरा आणि परवा तिसरा व्हिडिओ दाखवणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.


संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता लेटर ऑफ क्रेडिटच्या नावाखाली पैसे घेत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या खात्यासाठी शासनाकडून येणार्‍या निधीची टक्केवारी आधीच कंत्राटदारांकडून गोळा केली जाते.

एलोसीच्या टक्केवारीतील 2 लाख 80 हजाराची रक्कम कंत्राटदार अधिकार्‍याला देताना दिसतो. हे फक्त एका कंत्राटदारांकडून घेतल्याचे उघड झाले आहे. परंतु अशा अनेक कंत्राटदारांकडून हे पैसे घेतले जातात. त्यात कार्यकारी अभियंत्यांचा हिस्सा वेगळा आहे. माझ्याकडे उपअभियंत्यापासून सगळ्यांचे व्हिडिओ आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची. त्यातून टक्केवारी घेतली जात होती. मात्र आता शासनाकडून पैसे आणायचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे घेतात. त्यानंतर विभागाकडून काम पूर्ण झाल्यावर जे बिल निघते त्याचेही वेगळे पैसे मागितले जातात, असे कंत्राटदाराने सांगितले.

हा भ्रष्टाचार उघडपणे सुरू आहे. या व्हिडिओत अधिकारी म्हणतो की वरच्यांना पैसे द्यायचे आहेत. हे वरचे कोण याचा शोध घ्यायला हवा.
ते पुढे म्हणाले की, शासनाकडून 1 कोटी निधी आला तर त्यातून सर्वांची बिले भागवली जात नाहीत. त्यात कंत्राटदारांची बोली लागते. माझे बिल पेमेंट करा, तुम्हाला एवढी रक्कम देईन, अशा प्रकारे कंत्राटदारांची बिलांसाठी बोली लावली जाते.

अनेक कंत्राटदारांना कामे न करताच बिलाचे पैसे दिले जातात. ज्या कंत्राटदारांनी काही काम केले नाही, अशांची बोली जास्त लागते. कारण त्यांनी कामच केलेले नसते. जवळजवळ दहा कंत्राटदारांची मिळून एकूण पाच कोटींची रक्कम वाटप झाली आहे. त्यातील पसाळकर इन्फ्रा यांचे एकूण बिल 44 लाख 21 हजार 135 रुपये होते, त्यांना 41 लाख 12 हजार 363 रुपयांचा चेक दिला आहे.

आदर्श विजय निकम यांचे बिल 22 लाख 75 हजार 6 रुपये होते, त्यांना 21 लाख 20 हजार 70 रुपयांचा चेक  दिला आहे. साई प्रसाद एंटरप्राइजेस यांचे एकूण बिल 22 लाख 63 हजार 350 रुपये होते, त्यांना 21 लाख 64 हजार 96 रुपयांचा  चेक दिला आहे. असे दहा कंत्राटदार आहेत. हा व्हिडिओ मला एका कंत्राटदारानेच दिला आहे.

त्यावर मी त्याला विचारले की, यात तुझे नुकसान होणार नाही का? त्यावर त्याने उत्तर दिले की, आम्ही मेलेली कोबंडी आहोत. सगळीकडून पैसे खाल्ले जात आहेत. आम्ही आता आगीला भीत नाही.


देशपांडे म्हणाले की, आधी लोकांना कोपर्‍यात नेऊन पैसे घ्यायचे, आता ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात. पीडब्ल्यूडी विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. अनेक कंत्राटदारांनी सांगितले की, 20 टक्के कार्यकारी अभियंता मागतो. जो जास्त बोली लावतो, त्याचे पेमेंट होते, बाकींच्याचे पेमेंट होत नाही. प्रत्यक्षात काम होत नाही, फक्त कागदावर योजना असतात.

आजचा व्हिडिओ वरळी आणि हाफकिन इन्स्टिट्यूटच्या सार्वजनिक बांधकाम शाखेचा आहे. किती निर्लज्जपणे आणि उघडपणे पैसे घेतले जात आहेत, याचे हे उदाहरण आहे. यात अभियंता विनोद धुमाळ हा अभियंता पैसे गोळा करत आहे. त्यात कुणाकुणाचे वाटे आहेत, निधी वाटप करण्यात कुणाचा सहभाग आहे, कोण कोण अधिकारी, मंत्री आणि आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी सहभागी आहेत याची चौकशी झाली पाहिजे.

हा एक व्हिडिओ आज पोस्ट केला, उद्या दुसरा करू, परवा तिसरा करू. जोपर्यंत शासन या प्रकाराची दखल घेत नाही आणि आरोपांना उत्तर देत नाही तोवर आम्ही ही प्रकरणे बाहेर काढत  राहू आणि सरकारला जाब विचारू.


या आरोपामुळे खळबळ उडाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, देशपांडे यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. ज्युनिअर इंजिनिअर असो किंवा या प्रकरणात जो कोणी सहभागी असेल, त्यांच्यावर 100 टक्के कारवाई करण्यात येईल. त्याला कुणाचे पाठबळ असेल तरी त्याची माहितीही आम्ही घेत आहोत. याबाबत अधिकार्‍यांना तत्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आजच्या अधिवेशनात याची चर्चाही झाली नाही.

मी पगारावर समाधानी


सरकार भ्रष्ट आहे यावर आज आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यानेच शिक्कामोर्तब केले. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी त्यांच्या टेबलवर बोर्ड लावला आहे. त्यावर लिहिले आहे ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे‘. खवले यांची ही भूमिका आणि त्यांनी लिहिलेला बोर्ड याचे कौतुक होत आहे.

मात्र त्यांच्या या बोर्डचा अर्थ सरकारमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्यांना त्यात सहभागी व्हायचे नाही असा होतो. यामुळे त्यांनी असा बोर्ड लिहून सरकारची इज्जत वेशीवर टांगली आहे. याबाबत त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न आहे.

आमदार महेंद्र दळवींकडे नोटांची बंडले
अंबादास दानवेंनी व्हिडिओ पोस्ट केला


उबाठा नेते अंबादास दानवे यांनी आज मोठा कॅश बॉम्बच टाकला. शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे नोटांच्या बंडलासह दिसत असतानाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला. हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

दानवेंनी आमदाराचे नाव सुरुवातीला घेतले नाही. मात्र नंतर ते दळवी आहेत असे सांगितले. त्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यात राजकारण तापले. पण या व्हिडिओचीही अधिवेशनात चर्चा झाली नाही.


विरोधकांनी हा व्हिडिओ सत्ताधार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण असल्याचा आरोप केला, तर शिंदे गट आणि भाजपा नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना तो एआयच्या मदतीने बनवल्याचे म्हणत दानवे यांच्यावरच पलटवार केला आहे.


उबाठा नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला की, नोटांच्या बॅगा भरलेला व्हिडिओ घरातलाच आहे. कदाचित त्यांना नोटा नंतर द्यायच्या असतील म्हणून दाखवल्या जात आहेत. सध्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीने सत्ता आणि संपत्तीचा हैदोस घातला आहे, हे जनतेसमोर आणण्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट केला. दळवी यांना यावर आक्षेप असेल, तो व्हिडिओ मॉर्फ असेल तर त्यांनी पोलीस तक्रार करावी.

पोलिसांनी माझी चौकशी केली तर मी त्यांना सविस्तर माहिती देईन. कोणीही आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. परंतु 50 खोके एकदम ओके असे म्हटल्यावर काही लोकांना राग येत होता. त्यामुळे खोक्यांचे राजकारण सुरू आहे, हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला. कोणाशी माझे व्यक्तिगत शत्रुत्व नाही.

आत्ताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीने जनतेची लूटमार करतात, एवढेच मला दाखवायचे आहे. मी कुणाचा राजीनामा मागितलेला नाही. मला त्या विषयाशी काही देणेघेणेपण नाही. पण या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळे ओक्के आहे!
हा व्हिडिओ राजकीय शत्रुत्वातून अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच पुरवला असल्याचा आरोप दानवे यांनी फेटाळून लावला.

ते म्हणाले की, तटकरे आणि माझे मागील वर्षभरात कधी बोलणे झालेले नाही. मला व्हिडिओ कुठून मिळाला हे सांगण्याची आवश्यकता नाही. संजय शिरसाट यांचादेखील व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. त्यांचाही घरातीलच व्हिडिओ होता. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता महेंद्र दळवींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे.  


दानवे यांच्या आरोपावर आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अंबादास दानवे किती खरे बोलतात, किती खोटे बोलतात हे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते. वरिष्ठ नेत्याला हे शोभनीय नाही. दानवे यांचा बोलवता धनी वेगळा आहे. दानवेंनी तो व्हिडिओ नीट दाखवावा. मी व्हिडिओत असेन तर मी आमदारकीचा राजीनामा देईन.

ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतेच काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी कुत्रे विचारत नाही. या व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडिओ समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यासकट दाखवावा. त्यांनी व्हिडिओ कट करून दाखवू नये. मला व्हिडिओबद्दल काहीही माहिती नाही.

दानवे यांनी पुरावे देऊन, हा व्हिडिओ माझाच आहे, हे सिद्ध करून दाखवावे. दानवेंनी व्हिडिओ मॉर्फ केला आहे. दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. दानवे सुपारीबाज नेता आहे. रायगडमध्ये शिंदे गटाचे वेगळे प्रस्थ आहे. त्यामुळे इकडच्या बड्या नेत्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी सुपारी दिली. शिंदेसेनेचे रायगड जिल्ह्यातील आणखी एक आमदार महेंद्र थोरवे यांनी दळवींचा व्हिडिओ व्हायरल होण्यात सुनील तटकरे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला.

ते म्हणाले मला विश्वास आहे की, महेंद्र दळवी असे काही करणार नाहीत. अंबादास दानवे यांनी जाणीवपूर्वक अधिवेशनाच्या काळात हा व्हिडिओ व्हायरल केला. रायगडमध्ये ज्या प्रकारचे  राजकारण सुरू आहे त्याच्याशी या सगळ्याचा संबंध असावा. सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करतात.

ते कुटील नीतीचे राजकारण खेळतात. त्यामुळे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे यांनी संगनमताने महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल केला असावा.  शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले म्हणाले की, पोस्टमध्ये संपूर्ण चेहरा दाखवायला पाहिजे होता म्हणजे सर्व स्पष्ट झाले असते. भाजपा नेते व मंत्री नितेश राणेंनी यावरून उद्धव ठाकरेंवरच टीका केली. ते म्हणाले की, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कॅशच्या बाबतीमध्ये काही बोलूच नये.

कर्जतच्या फार्म हाऊसवर सर्च ऑपरेशन केले की मग कशी पळापळ होईल ते बघा. उबाठा आमदार आदित्य ठाकरे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सर्वांनी पाहिला. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही. पण सत्ताधारी आमदार असे पैशाच्या बॅगा घेऊन फिरतात.

यापूर्वीही असे व्हिडिओ आले होते, अजूनही येतील. आता सर्व ठिकाणी हेच सुरू आहे. ते हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतात आणि ‘आनंदाच्या शिधा’चे वाटप सुरू आहे, ते पैसे कुणाचे आहेत? सायंकाळी उशिरा महेंद्र दळवी यांनी दावा केला की, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा मी त्यांचे अभिनंदन करणारा माझा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

तो व्हिडिओ मॉर्फ करून तयार केला आहे. दळवी यांनी आज तो जुना व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला. यानंतर या आरोप- प्रत्यारोपांना कोणते वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


शिंदेंच्या शिवसेनेने या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले, ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महेंद्र थोरवे यांनी माझ्यावर बेजाबदारपणे केलेले आरोप आहेत. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकांशी राजकीय संघर्ष झाला. पण हा संघर्ष राजकीय विचारधारेवर होता. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु असे कृत्य करण्याचा विचार माझ्या मनात कधी आला नाही. अंबादास दानवे यांची आणि माझी मागील 1-2 वर्षांपासून भेट किंवा बोलणे नाही. त्यांच्याशी संबंधही नाही.

ती लाल टीशर्ट घातलेली व्यक्ती कोण?


दानवे यांनी सांगितले की, महेंद्र दळवी यांच्यासमोर लाल टीशर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती नोटा देत आहे. ती कोण हे शोधणे महत्त्वाचे आहे. एवढ्या नोटा असणारा माणूस दळवीपेक्षा मोठाच असेल. मी त्याला ओळखतो, पण त्याचा चेहरा व्हिडिओत दिसत नसल्याने मी त्याचे नाव घेणार नाही. तो कोण आहे ते पोलिसांनी शोधावे.


हे देखील वाचा –

बिबट्यांच्या हल्ल्यांवर वनमंत्र्यांचा अजब-गजब उपाय; ₹1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणार

पान मसाल्यावर अधिभार विधेयकाला संसदेत मंजुरी

Web Title:
संबंधित बातम्या