NGT Halts Tapovan Cutting Till Jan 15 – नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. या अंतरिम स्थगितीनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिकेला वृक्षतोड थांबविण्याचा आदेश दिला आहे.
वकील श्रीराम पिंगळे यांनी सांगितले की, हरित लवादामध्ये नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल झाली होती. हरित लवादाने तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. हा अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश आहे. पिंगळे पुढे म्हणाले की तपोवनातील झाडे तोडण्याआधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी, असे आमचे मत आहे.
ती न राबवताच वृक्षतोड केली जात आहे. एकदा तोडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण नीट केले जात नाही, हा अनुभव आहे. नाशिक मनपा आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत त्या अत्यंत बेजाबदार विधाने करताना दिसल्या. याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटलेले असताना त्यांनी या वृक्षतोडीला केवळ १-२ जणांचा विरोध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर झुडपे तोडणार असल्याचे सांगितले.
मात्र हजारो झाडे तोडण्याची पालिका तयारी करत आहे.जून , सप्टेंबर दरम्यान १२७० झाडे तोडण्याची परवानगी घेऊन ३०० झाडे एसटीपीच्या नावाखाली तोडली. याशिवाय इतर ठिकाणी १७ हजार झाडांचे वन उभारल्याचे सांगितले. मात्र त्याठिकाणी मृत झाडे आहेत.
हरित लवादाने स्पष्ट केले की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही झाड तोडायचे नाही.
त्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वनअधिकाऱ्यांना सर्व हरकती ऐकाव्या लागतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा विरोध त्यांना गृहीत धरावा लागेल. त्यानुसार त्यांना कारणमिमांसा सादर करण्यास सांगितले आहे.
शासनाने रायबेरीयन बफर झोन मध्ये जो प्रदर्शन सेंटरचा घाट घातला आहे त्याचा उपयोग काय आणि त्यासाठी किती झाडे तोडावी लागणार याबाबत लक्ष देण्याची विनंती आम्ही समितीला केली आहे. लवादाच्या सूचनेनुसार समितीसोबत राहण्याची मुभा मला आहे. अनावश्यक वृक्षतोड टाळणे आमचा उद्देश आहे.भरपाई म्हणून जे वन लावले जाणार आहे त्याकडे आम्ही ५ वर्षे लक्ष देणार आहोत.
मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केलेल्या याचिकेत तपोवनातील झाडांची होणारी मोठ्या प्रमाणातील तोड थांबवण्याची मागणी केली होती. या याचिकेनुसार परिसरातील झाडे नाशिकच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांची तोड झाल्यास संपूर्ण परिसराचा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
वृक्षतोड करून त्या जागी बांधकाम करण्याची शक्यता व्यक्त करत याला ठोस विरोध नोंदवला होता. या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेत लवादने प्रशासनाकडून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया, परवानग्यांची नोंद आणि वृक्षतोडीमागील प्रत्यक्ष गरज याबाबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.
या आदेशामुळे प्रशासनात अचानक हलचल सुरू झाली आहे. वृक्षतोड थांबवावी लागणार असल्याने संबंधित विभागांनी प्रस्तावित कामकाजावर पुनर्विचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील तपोवन परिसर शहराच्या फुफ्फुसांसारखा मानला जातो. अनेक धार्मिक स्थळे, गोदाकाठचा प्रदेश, नैसर्गिक जलस्रोत आणि समृद्ध वृक्षसंपदा यामुळे हा भाग पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे.
त्यामुळे येथे होणारी कोणतीही प्रकल्पगत हस्तक्षेप प्रक्रिया अधिक सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.मनसे नेते अमेय खोपकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.दरम्यान,स्थानिक नागरिकांमध्येही दिलासा व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर ‘सेव्ह तपोवन’ मोहीम पुन्हा जोर धरताना दिसत आहे.
राजमुद्रीहून झाडांचा पहिला कंटेनर पोहचला
हैदराबादच्या राजमुंद्री येथून आणलेली १५ हजार झाडे नाशिकमध्ये दाखल होण्यास आज सुरुवात झाली. या झाडांचा पहिला कंटेनर शहरात पोहोचला. पुढील काही दिवसांत उर्वरित झाडेही येणार आहेत.काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन राजमुंद्री येथे गेले होते आणि त्यांनीच ही झाडे स्वतः निवडली.
या झाडांमध्ये वड, पिंपळ, नीम, जांभूळ यांसारख्या देशी प्रजातींचा समावेश आहे. मनपा उद्यापासून नाशिकच्या विविध भागांत वृक्षलागवडीला सुरुवात करणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार झाडांचे वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर तपोवन परिसरातील वृक्षतोडीसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा –
महाराष्ट्र शासनाच्या 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; पाहा संपूर्ण लिस्ट
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी; रिफंडही मिळणार, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश









