Jewish community shooting : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बॉन्डी किनार्यावर हनुक्का सण साजरा करणाऱ्या ज्यू समुदायावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार (Jewish community shooting) केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
आज दुपारी नॉर्थ बॉन्डी बीच (North Bondi Beach) परिसरात अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत काळ्या कपड्यांतील दोन तरुण रस्त्यावर गोळीबार करताना दिसतात.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले, तर दुसऱ्याला अटक करण्यात आली आहे. लोकांनी सुमारे ५० गोळ्यांचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले. या घटनेदरम्यान एका नागरिकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून हल्लेखोराकडील रायफल हिसकावून घेतल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, बॉन्डीमधील घटना अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा जीव वाचवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत, असे म्हटले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ज्यू बोर्ड ऑफ डेप्युटीजने ज्यू समुदायातील नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले असून सर्व सामुदायिक कार्यक्रम उपक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.
दहशतवादी घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी संवेदना व्यक्त केली.
भारतीय पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील दहशतवादी घटनेबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, आज ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये हनुक्का या ज्यू सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्यात आले. भारतातील लोकांच्या वतीने, मी प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांबद्दल सहानुभूती आणि संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. भारत दहशतवादाविरुद्धच्या लढाईला पाठिंबा देतो.
हनुक्का सण म्हणजे काय?
हनुक्का हा यहूदी धर्मातील ‘प्रकाशाचा सण’ आहे. तो अंधकारावर प्रकाश, अत्याचारावर श्रद्धा आणि निराशेवर आशेच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हा सण आठ दिवस साजरा केला जातो.
हनुक्काचा इतिहास सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचा आहे. यूनानी शासकांनी यहुदी धर्मावर निर्बंध लादल्यामुळे मक्कबी योद्ध्यांनी बंड केले आणि अखेर विजय मिळवला. विजयानंतर पवित्र स्थळी दिवा लावण्यात आला, मात्र एक दिवसाचे तेल चमत्काराने आठ दिवस जळले. या चमत्काराच्या स्मरणार्थ हनुक्का साजरा केला जातो. दररोज मेनोरा (हनुकिया) पेटवली जाते. कुटुंबीय एकत्र येतात, धार्मिक गीते गायली जातात, खेळ खेळले जातात आणि मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. तेलात तयार केलेले पदार्थ खाल्ले जातात. हा सण प्रेम, एकता आणि आशेचा संदेश देतो.
हे देखील वाचा-
मेस्सी दौरा आयोजकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी
काशीच्या अन्नपूर्णा मंदिरात आता १ वर्षांच्या बाळांना ‘दूध प्रसाद’









