Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray: धुरंधरच्या रेहमान डकैतची राजकीय एन्ट्री! उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर करत शिंदे गटाची टीका

Uddhav Thackeray: धुरंधरच्या रेहमान डकैतची राजकीय एन्ट्री! उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर करत शिंदे गटाची टीका

Uddhav Thackeray Cartoon Rehman Dakait : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुलवाजले आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एकाएकी तापले आहे. या...

By: Team Navakal
Uddhav Thackeray Cartoon Rehman Dakait
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray Cartoon Rehman Dakait : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुलवाजले आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एकाएकी तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली . या सभेत ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असा नारा देण्यात आला.

मात्र, ही सभा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पोस्ट करून ठाकरे गटाच्या या घोषणेचा फज्जा उडवला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता पहिल्या दिवसापासूनच आक्रमक होताना दिसत आहे.

रेहमान डकैतवरून उद्धव ठाकरेंवर बोचरा निशाणा

सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या धुरंधर चित्रपटातील पाकिस्तानातील गँगस्टर रेहमान डकैत या पात्राचा आधार घेत शिवसेनेने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांना रेहमान डकैतच्या रूपात दाखवण्यात आले असून त्यांच्या मागे मुंबई महानगरपालिकेची इमारत दिसत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या मूळ घोषणेत बदल करून व्यंगचित्रात उद्धव ठाकरे ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असे म्हणताना दाखवले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे ‘खाऊन नव्हे करून म्हणा’ असे घाबरून सांगताना दिसत आहेत. करून दाखवलं म्हणता म्हणता खाऊन दाखवल्याची पाळी आली आणि मुंबईकर या डकैतचे बळी ठरले, अशा शब्दांत शिवसेनेने ठाकरेंवर टीका केली आहे.

अधिवेशनातील वादाचे पडसाद आणि भ्रष्टाचाराचे आरोप

या वादाची खरी ठिणगी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पडली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरे यांची तुलना रेहमान डकैतशी केली होती. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण आहेत हे जनतेला माहीत आहे, अशी बोचरी टीका शिंदे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिंदेंचा उल्लेख ‘फेकनाथ मिंधे’ असा केला होता. आता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही गेल्या 25 वर्षांत मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटाने 1 लाख 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भ्रष्टाचाराच्या याच मुद्द्यावरून ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी आता शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट प्रहार केला आहे. आगामी निवडणुकीत मतांच्या लढाईत कोण खरा धुरंधर ठरेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या