Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या संधर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधतात नाशिक जिल्हा न्यायालयाने अखेर अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
नाशिक उच्च न्यायालयाने काल सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात शेवटी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आतापर्यंतचा मोठा धक्का मानला जातो. कोर्टाच्या या महत्वपूर्ण निर्णयानंतर माणिकराव कोकाटेंनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. अटके पासून दिलासा मिळावा यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे देखील म्हटले जाते.
माणिकराव कोकाटे यांनी त्वरीत पोलिसांसमोर हजर व्हावे अथवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असा निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत. कायद्यापुढे सर्व लोक समान असतात, मग तो कोणी मंत्री असो किंवा अजून कोणी, असे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट शब्दात सांगितले. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद देखील केला. कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा, असे अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी कोर्टाला म्हटले.
माणिकराव कोकाटे यांनी कालच न्यायालयात हजर राहणे, अपेक्षित होते; परंतु,ते काल सुनावणीला हजर राहिले नाहीत, यावरुन न्यायालयाने त्यांना जोरदार फटकारले. माणिकराव कोकाटे हे अटक टाळण्यासाठी कालच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत, असा आरोप देखील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ यांनी केला. दरम्यान, आजच्या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची महत्वाची माहिती दिली. परंतु, कोकाटे यांनी असल्या कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आहेत, असा गंभीर दावा याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष राठोड यांनी केला.
माणिकराव कोकाटेंविरोधात नक्की आरोप काय?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी जवळपास ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका देखील प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी सुरु केली होती.
प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि तब्ब्ल ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती; परंतु, काल झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय अंतिम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
हे देखील वाचा – Gen-Z Post Office : डिजिटल पिढीसाठी खास मुंबईतले पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस; उद्या होणार उद्घाटन









