Manikrao Kokate : सध्या राज्यात निवडणुकीसोबत अजून एक नाव गाजतंय ते म्हणजे माणिकराव कोकाटे. आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी उलथा पालथं होताना दिसत आहे. शासकीय सदनिका प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याआधी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटनंतर आता नाशिक पोलिसांची (Nashik Police) हालचाल वेगाने सुरू झाल्याचे दिसत आहे.
माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का?अश्या चर्चा देखील रंगल्या आहेत. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागवली असून कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी सुरु असल्याची माहिती आहे. पूर्ण कायदेशीर पडताळणी केल्यानंतर नाशिक पोलीस पुढची सूत्र हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे (Vijay Kokate) यांच्याविरोधात देखील अटक वॉरंट जारी केले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या रुग्णालयातील उपचारांमुळे पोलिसांची पावले थोडी मंदावली असली, तरी दुसरीकडे विजय कोकाटेंच्या शोधासाठी हालचाली अधिक तीव्र असल्याचे दिसून येत आहे. तर, कायदेशीर पडताळणीनंतर नाशिक पोलीस नेमका काय निर्णय घेणार, माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार कि नाही आणि विजय कोकाटे पोलिसांच्या हाती कधी लागणार या सगळ्या बाबींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
हे देखील वाचा – Solapur News : मनपा निवडणुकीपूर्वी भाजपा कार्यकर्त्याचा आक्रोश; तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन भाजपा कार्यकर्त्याची थेट धमकी..








