Election 2025 : राज्यात निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यात आता महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आता अर्जासोबतच शहर विकासासंबंधी निबंधदेखील सादर करावा लागणार आहे. निवडून आल्यानंतर मतदारसंघात कोणत्या विकास योजना राबविणार आहेत, याची स्पष्ट मांडणी उमेदवारांना करावी लागणार असून त्यासाठी १०० ते ५०० शब्दमर्यादेत हा निबंध लिहावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने १७ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशातील ‘ब’ क्रमांकात मतदारसंघ विकास योजनेबद्दल अधिक स्पष्टता दिली आहे.
निवडणुकीत भ्रष्ट मार्ग अवलंबणार नाही, असे शपथपूर्वक देखील जाहीर करावे लागणार आहे. याशिवाय, उमेदवाराने स्वतः, त्याची पत्नी, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असे देखील या शपथपत्रात नमूद करावे लागणार आहे.
नगर परिषद मतदानाचा महत्वाचा टप्पा २ आज :
राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य तसे विविध नगरपरिषदा आणि नगर पंचायतींमधील १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान आज पूर्ण होणार असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे एकत्रित निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले होते. त्यामुळे आता नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









